भारत आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत

युवा लक्ष्य सेन आणि पुरुष दुहेरीतील जोड्यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने थायलंडला पराभवाचा धक्का देत आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे भारतीय संघाला किमान कांस्यपदक मिळणार हे निश्चित झाले आहे. शनिवारी होणार्‍या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतासमोर इंडोनेशियाचे आव्हान असेल.
थायलंडविरुद्ध साई प्रणित आणि किदाम्बी श्रीकांतसारख्या आघाडीच्या खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, एकेरीत लक्ष्य सेन, तसेच दुहेरीत एमआर अर्जुन-ध्रुव कपिला आणि चिराग शेट्टी-श्रीकांत यांनी अप्रतिम खेळ करत भारताला ही लढत ३-२ अशी जिंकवून दिली. या विजयासह भारताने आशियाई सांघिक स्पर्धेतील दुसरे पदक निश्चित केले. याआधी भारताने हैदराबादमध्ये २०१६ साली झालेल्या स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते.
जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानी असणार्‍या साई प्रणितला थायलंडविरुद्ध भारताला चांगली सुरुवात करुन देण्यात अपयश आले. त्याचा कांटाफोन वांगचरॉनने १४-२१, २१-१४, १२-२१ असा पराभव केला. एकेरीच्या दुसर्‍या सामन्यात किदाम्बी श्रीकांतवर कुंलावूत वितीदसार्नने २०-२२, १४-२१ अशी मात केली. यानंतर दुहेरीत एमआर अर्जुन-ध्रुव कपिलाने आपला सामना जिंकला. तर एकेरीत १८ वर्षीय लक्ष्य सेनने अविहिंगसनॉनला २१-१९, २१-१८ असे पराभूत केले. त्यामुळे या लढतीत २-२ अशी बरोबरी झाली. अखेरच्या सामन्यात श्रीकांत-चिरागने थायलंडची जोडी मनीपाँग जॉन्गजीत-फुआंगफुपेटवर २१-१५, १६-२१, २१-१५ अशी मात करत भारताला ही लढत जिंकवून दिली.

No comments

Powered by Blogger.