मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे पीडितेच्या मृत्यूवर संताप व्यक्त करताना

हिंगणघाटमधील पीडितेच्या मृत्यूवर संताप व्यक्त करताना मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी हैदराबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईचं समर्थन करण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये हीच न्यायव्यवस्थेला आणि केंद्र शासनाला हात जोडून विनंती असल्याचं म्हटलं आहे. हिंगणघाट जळीतकांडातील तरुणीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यावर वेगवेगळ्या क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. संबंधित तरुणीचा मृत्यू हा दुर्दैवी असून हळहळ वाटत आहे. काही कारण नसताना एखाद्याला जीव द्यावा लागत आहे याबद्दल एक सात्विक संताप देखील होत आहे असंही ते म्हणाले आहेत. 

मकरंद अनासपुरे म्हणाले की, “हिंगणघाट जळीतकांडातील भगिणीच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी ऐकून खूप हळहळ वाटत आहे. एक सात्विक संताप देखील होत आहे की, कुठलंही कारण नसताना अशा पद्धतीने एखाद्याला जीव द्यावा लागतोय. ही समाजासाठी फार दुर्दैवाची गोष्ट आहे. केंद्र सरकार आणि न्यायव्यवस्थेला हात जोडून विनंती आहे की अशा प्रकरणांचा लवकरात लवकर छडा लावून आरोपींना कडक शासन होणे गरजेचे आहे. निर्भयाचे बलात्कारी अजूनही फासावर चढलेले नाहीत. तारखांवर तारखा पडत चाललेल्या आहेत. एकंदरीतच अशा पद्धतीच्या घटनांमध्ये वाढ होणे हे समाजाला चिंतीत करणारे आहे. या आरोपींना तात्काळ शासन व्हावं असं नागरिक म्हणून फार मनापासून वाटतं. हैदराबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईचं समर्थन करण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये हीच न्यायव्यवस्थेला आणि केंद्र शासनाला हात जोडून विनंती,”

No comments

Powered by Blogger.