औष्णिक वीज निर्मितीचा ८४ टक्के वाटा विदर्भाचा

औष्णिक वीज निर्मितीचा ८४ टक्के वाटा विदर्भाचा
महानिर्मितीचे सातपैकी चार ठिकाणचे वीज प्रकल्प विदर्भात असून, त्यातून अधिकाधिक वीज निर्मिती होत आहे. विदर्भाबाहेरील प्रकल्पातून नाममात्र उत्पादन होते, तर काही ठिकाणचे प्रकल्प बंद आहेत. त्यामुळे औष्णिक वीज निर्मितीचा भार विदर्भावरच पडला आहे. सध्या औष्णिक प्रकल्पातून होणाऱ्या एकूण वीज निर्मितीतील ८४ टक्के वाटा एकटय़ा विदर्भाचा आहे.
मुबलक कोळसा व पाण्यामुळे विदर्भात मोठय़ा प्रमाणात औष्णिक वीज प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यात महानिर्मितीसह खासगी कंपन्यांचे प्रकल्पही आहेत. राज्यात महानिर्मितीची औष्णिक, गॅस, हायड्रो व सौर प्रकल्पातून १३१८२ मेगावॅट वीजनिर्मितीची क्षमता आहे. यात औष्णिक प्रकल्पांचा मोठा वाटा असून, त्यांची क्षमता ९७५० मेगावॅट वीज निर्मितीची आहे. राज्यात सात ठिकाणी महानिर्मितीने औष्णिक वीज प्रकल्प उभारले आहेत. यापैकी चार विदर्भात आहेत. विदर्भातील कोराडीतील पाच संचातून एकूण २४०० मेगावॅट, खापरखेडा येथे पाच संचातून १३४० मेगावॅट, चंद्रपूरच्या सात संचातून २९२० मेगावॅट व अकोला जिल्हय़ातील पारस येथे  ५०० व २५० मेगावॅटचे दोन संच आहेत.विदर्भाबाहेर नाशिक येथे एकूण ६३० मेगावॅटचे तीन संच, परळीत ७५० मेगावॅटचे तीन, तर भुसावळ येथे १२१० मेगावॅट वीज उत्पादन करण्यासाठी तीन संच आहेत.
महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पातील ९ फेब्रुवारीचे प्रत्यक्ष उत्पादन ५१३५ मेगावॅट आहे. त्यापैकी ८३.६० टक्केम्हणजे ४२९३ मेगावॅट वीज विदर्भातून उत्पादित होते. महागडय़ा वीज निर्मितीमुळे भुसावळचा प्रकल्प पूर्णत: बंद ठेवला आहे.नाशिक येथून नाममात्र १५६ व परळी प्रकल्पातून ६८५ मेगावॅट वीज मिळते. उर्वरित संपूर्ण औष्णिक प्रकल्पातील वीज उत्पादन हे विदर्भातून होत आहे. कोराडी प्रकल्पातून १०३३ मेगावॅट, खापरखेडा ११६१, चंद्रपूर १९१३ व पारस येथील प्रकल्पातून १८६ मेगावॅट वीज निर्मिती सध्या होते. वीज निर्मितीचा डोलारा हा विदर्भावर आहे.

No comments

Powered by Blogger.