वाचा झारखंडच्या हॉकीपटू पुंडी सारुची यशोगाथा

स्वप्न पाहण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो, मात्र ती पूर्ण करण्यासाठी धमक आणि जिद्द प्रत्येकात असतेच असं नाही. मात्र झारखंडच्या नक्षलग्रस्त भागातील पुंडी सारु या मुलीने सर्व अडचणींवर मात करत हॉकीपटू बनण्याच्या आपल्या स्वप्नाच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं आहे. अमेरिकन दुतावास आणि ‘शक्तिवाहिनी’ या सामाजिक संस्थेतर्फे झारखंडमधील मुलींसाठी हॉकी कम लिडरशीप कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं. यातील १०७ मुलींमधून ५ मुलींची अमेरिकत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये पुंडी सारुने आपलं स्थान पक्क केलं आहे.
झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील हेसल या नक्षलग्रस्त भागात पुंडी आणि तिचं कुटुंब राहतं. आज पुंडीचं स्वप्न पूर्ण होत असलं तरीही यासाठी तिने बराच संघर्ष केला आहे. ४ भावडांपैकी पुंडीचा दुसरा क्रमांक लागतो. पुंडी सध्या नववीत शिकत आहे, काही महिन्यांपूर्वी पुंडीच्या बहिणीने आत्महत्या केल्यामुळे ती हॉकीपासून दूर गेली होती. शाळेत असतानापासून पुंडीला हॉकीची आवड निर्माण झाली. गेली ३ वर्ष ती हॉकी खेळते आहे. मात्र एक काळ असा होता की पुंडीच्या परिवाराकडे हॉकीस्टिक घेण्याचेही पैसे नव्हते. यासाठी पुंडीच्या परिवाराने घरातली नाचणी विकली. त्यामधून आलेले पैसे आणि पुंडीला शिष्यवृत्तीतून मिळालेल्या १५०० रुपयांमधून घरच्यांनी नवीन हॉकीस्टिक विकत घेतली.
पुंडीचे वडील हे मजुरीचं काम करायचे, मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात त्यांच्या हाताला दुखापत झाल्यामुळे ते सध्या घरीच असतात. दररोज हॉकी खेळण्यासाठी पुंडी आठ किलोमीटर सायकल चालवत खुंटीला जाते. आतापर्यंत पुंडीने अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवली आहेत. भारतीय महिला हॉकी संघातील निक्की प्रधान ही पुंडीची रोल मॉडेल आहे. तिच्यासारखा खेळ जमायला हवा असं पुंडी आवर्जून सांगते. अमेरिकेच्या मिडलबरी कॉलेजमध्ये पुंडीला २१ ते २५ दिवसांचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

No comments

Powered by Blogger.