दंगली तर होतच राहतात, तो जीवनाचा एक भाग आहे - मंत्री रणजीतसिंह चौटाला
दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर हरयाणाचे मंत्री रणजीतसिंह चौटाला यांनी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. “दंगली तर होतच राहतात, तो जीवनाचा एक भाग आहे”, असं त्यांनी म्हटलं आहे. चौटाला यांच्या या वक्तव्यावर सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हरयाणा विधानसभेच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना चौटाला म्हणाले, “दंगली तर होत राहतात यापूर्वीही झाल्या आहेत. जेव्हा इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा देखील संपूर्ण दिल्ली जळत होती. हा तर आता जीवनाचा एक भाग झाला आहे.”
रणजीतसिंह चौटाला हे हरयाणा सरकारमध्ये ऊर्जा मंत्री आहेत. ते अपक्ष निवडणूक लढवून विधानसभेत पोहोचले आहेत. त्यांनीच सर्वप्रथम सरकार स्थापनेसाठी भाजपाला आपलं समर्थन दिलं होतं. हरयाणाचे माजी मुख्यमंत्री चौधरी देवीलाल यांचे ते पुत्र आहेत तर ओमप्रकाश चौटाला यांचे छोटे भाऊ आहेत.
दरम्यान, दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्याचे (सीएए) समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये शनिवारी हिंसेची ठिणगी पडली त्यानंतर हा हिंसाचार वाढतच गेला. तब्बल चार दिवस ईशान्य दिल्लीच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणावर जोळपोळ करण्यात आली. यामध्ये आजवर ३४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर २५० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. या हिंसाचारावर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने दिल्ली पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
Post a Comment