पुण्यातील तापमानात अचानक घट

पुणे शहर आणि परिसरात कमाल-किमान तापमानात वाढ होऊन उकाडय़ातही काहीशी वाढ झाली असतानाच गेल्या दोन दिवसांपासून तापमानात अचानक मोठी घट नोंदविली जात आहे. दिवस आणि रात्रीचे तापमानही सरासरीच्या तुलनेत खाली आले आहे. त्यामुळे रात्री हवेत गारवा जाणवतो आहे. मात्र, पुढील काळात तापमानात पुन्हा वाढ होऊन ते सरासरीपुढे जाण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त केली जात आहे.
फेब्रुवारीतील दुसऱ्या आठवडय़ापासून शहरातील तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. आकाशाची स्थिती कधी निरभ्र, तर कधी ढगाळ राहत असल्यामुळे तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहेत. आठवडय़ापूर्वी तापमानात वाढ होऊन दुपारी उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला होता. त्याचप्रमाणे रात्रीचे किमान तापमानही सरासरीच्या पुढे गेल्याने रात्रीचा हवेतील गारवा नाहिसा झाला होता. दिवसाचे कमाल तापमान आठवडय़ापासून ३४ ते ३५ अंश सेल्सिअसवर होते. त्याचप्रमाणे रात्रीचे किमान तापमानही १६ अंशांच्या आसपास होते.
२५ फेब्रुवारीला तापमानात अचानक घट होण्यास सुरुवात झाली. ३५ अंशांच्या आसपास असलेले कमाल तापमान ३१.१ अंशांपर्यंत खाली आले. किमान तापमानही १६ अंश सेल्सिअसवरून १४.७ अंशांपर्यंत खाली आले. २६ फेब्रुवारीला त्यात आणखी घट झाली. या दिवशी कमाल तापमान ३०.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. ते सरासरीच्या तुलनेत २.५ अंशांनी खाली होते. रात्रीचे किमान तापमान १२.२ अंशांवर सरासरीखाली येऊन हवेत गारवा निर्माण झाला होता. मात्र, दोन दिवसांनंतर तापमानात पुन्हा
वाढ होणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्तकरण्यात आली आहे. कमाल आणि किमान दोन्ही तापमान पूर्ववत होऊन उकाडापुन्हा वाढण्याची शक्यताही  व्यक्त करण्यात येत आहे.
शहर आणि परिसरातील तापमानात सध्या घट झाली असली, तरी २७ फेब्रुवारीनंतर आकाशाची स्थिती अंशत: ढगाळ होण्याची शक्यता आहे. १ मार्चपर्यंत अशीच स्थिती राहण्याचा अंदाज आहे. परिणामी या काळात तापमानात पुन्हा वाढ होऊन दिवसाचे तापमान ३४ ते २५ अंशांच्या आसपास, तर किमान तापमान १६ ते १७ अंशांवर जाण्याची शक्यता आहे. २ फेब्रुवारीनंतर आकाश पुन्हा निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. परिणामी रात्रीच्या किमान तापमानात काहीशी घट होईल, अशी शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

No comments

Powered by Blogger.