यंदा उन्हाळा अधिक तापदायक ठरण्याची भीती
राज्यात सध्या तापमानाची विचित्र अवस्था अनुभवायला मिळत असताना यंदा
देशाच्या अनेक भागांत मार्च ते मे दरम्यान उन्हाळ्यामध्ये तापमान
नेहमीपेक्षा अधिक राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला
आहे. ईशान्य, पश्चिम, मध्य आणि दक्षिण भारतात काहिली सर्वाधिक असेल, असेही
स्पष्ट करण्यात आले.
दिल्ली, जम्मू-काश्मीर, हरयाणा, चंडीगड. पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व
राजस्थान, मध्य प्रदेशचा काही भाग, सौराष्ट्र, कच्छ, कोकण, गोवा, मध्य
महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कर्नाटकचा उत्तरेकडील भाग, केरळ या राज्यांत
तापमान दिवसा सरासरीपेक्षा ०.५ अंश सेल्सियसने जास्त राहील, असे हवामान
विभागातर्फे शुक्रवारी जाहीर करण्यात आले. गेल्या काही दिवसांत राज्यात
कोकण वगळता थंड वातावरण आहे.
मान्सूनच्या बाबतीत मात्र आनंदाची बातमी हाती आली असून एल निनो हा
पॅसिफिकमधील हवामान परिणाम यावर्षी मार्च ते मे दरम्यान फारसा क्रियाशील
नाही. त्यामुळे चांगल्या पावसाची शक्यता आहे. यात अधिक चित्र हे
एप्रिलमध्ये स्पष्ट होईल. देशातील प्रमुख धरणांत २० फेब्रुवारी अखेर
पाण्याचा साठा गतवर्षी पेक्षा ५४ टक्क्यांनी अधिक आहे. एकूण १०१.८७ अब्ज
घनमीटर पाण्याचा साठा शिल्लक आहे. २०१९ मध्ये मोसमी पाऊस सरासरीपेक्षा १०
टक्के अधिक होता.
मार्च ते मे दरम्यान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिल्याने उष्णतेच्या
लाटा निर्माण होतील. त्यात पंजाब, हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड,
हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड,
झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा व महाराष्ट्राचा काही भाग व किनारी
आंध्र प्रदेशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
Post a Comment