लग्नात व्हिडीओग्राफरची गोळया झाडून हत्या
व्हिडीओशूटींगचा अॅंगल पसंत नसल्याने, झालेल्या वादातून व्हिडीओग्राफी
टीममधील एका सदस्याची हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशातील फिरोझाबादमध्ये
एका लग्न सोहळयामध्ये गुरुवारी ही धक्कादायक घटना घडली. नशेमध्ये तर्रर्र
असलेल्या एका माणसाने व्हिडीओ शूटींग करणाऱ्या तरुणाची गोळया झाडून हत्या
केली. खैरगध पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दारीगपूर गावामध्ये लग्नाची वरात
सुरु असताना ही घटना घडली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
सत्येंद्र यादवने त्याच्या जवळ असणाऱ्या डबल बॅरल शॉटगनमधून
व्हिडीओग्राफी करणाऱ्या टीमवर दोन गोळया झाडल्या. यात दोन जण जखमी झाले.
मोठया प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे एका सदस्याचा मृत्यू झाला, तर
दुसऱ्याच्या प्रकृतीमध्ये प्रथमोपचारानंतर सुधारणा झाली अशी माहिती
ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राजेश कुमार यांनी दिली.
रोहित कुमार (२०) असे ठार झालेल्या व्हिडीओग्राफरचे नाव आहे.
गोळीबारानंतर सत्येंद्र यादव आणि कुलदीप दोघेही घटनास्थळावरुन फरार झाले.
रोहितचे नातेवाईक सुरेश चंद्रा यांच्या तक्रारीवरुन सत्येंद्र आणि कुलदीप
दोघांविरोधात कलम ३०४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दिनेश कुमार, रोहित कुमार आणि सत्येंद्र कुमार हे खुर्चीवरुन लग्नाच्या
वरातीचे शूटींग करत होते. अचानक यादव आणि कुलदीपने व्हिडीओग्राफी करणाऱ्या
तिघांबरोबर वाद घालायला सुरुवात केली. शूटींगचा अॅंगल त्यांना पसंत
नव्हता, त्यावरुन त्यांनी वाद घातला. सत्येंद्र यादवने बंदुकीतून दोन गोळया
झाडल्या असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
Post a Comment