माझ्यापेक्षा माझ्या पत्नीला जास्त पगार – देवेंद्र फडणवीस

Image result for amruta fadnavis book
माझ्यापेक्षा माझ्या पत्नीला जास्त पगार आहे. त्यामुळे तो माझ्या लक्षात राहतो असं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. आपल्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. अर्थसंकल्पात क्लिष्ट वाटणाऱ्या संज्ञा अतिशय सोप्या आहेत असं सांगताना त्यांनी आपल्या घरचं बजेट आणि राज्याचं बजेट यामध्ये जास्त फरक नसल्याचं सांगितलं.
“आपल्याला मिळणारा पगार, पत्नीला मिळणारा पगार ही आपली आवक आहे. तर घरचा खर्च जावक आहे. त्याच्याकरिता जे काही वित्तीय व्यवस्थापन आपण करतो आणि तसंच राज्याचं वित्तीय व्यवस्थापन असतं. यामध्ये जास्त फरक नाही. फक्त राज्यात अधिक व्यापकता असते. राज्याला जास्त मोठं काम करावं लागतं. आपण बजेट नीट समजून घेतलं तर भीती निघून जाईल,” असं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी माझ्यापेक्षा माझ्या पत्नीला जास्त पगार आहे म्हणून मला तो लक्षात राहतो असं मिश्किल वक्तव्य केलं.
“अर्थसंकल्प अनेकांना क्लिष्ट विषय वाटतो. अर्थसंकल्प ज्यावेळी सदस्यांना मिळतो, त्यावेळी बॅग भरुन त्यांना पुस्तकं मिळतात. त्या पुस्तकांचं नेमकं काय करायचं असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेक सदस्य पुस्तकं तिथेच ठेवतात आणि बॅग घेऊन निघून जातात. मला थोडा रस असल्याने मी त्या पुस्तकांचा अभ्यास केला,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
“हे पुस्तक सामान्य माणसाला बजेटमधील प्रत्येक गोष्ट सहजपणे कळली पाहिजे यासाठी हे आहे. आपण असं पुस्तक लिहिलं पाहिजे जे जास्तीत जास्त ४४ मिनिटात वाचता आलं पाहिजे अशी अट मीच ठेवली होती,” अशी माहिती फडणवीसांनी यावेळी दिली. बजेटसंबंधी बोलताना त्यांनी म्हटलं की, “जीडीपीचा नेमका अर्थ ५० टक्क्यांहून जास्त लोक सांगू शकत नाही. पण कार्यपद्धती आणि रचना कळली तर केंद्राचा किंवा राज्याचा असो अर्थसंकल्प समजू शकतो. त्याचं विश्लेषण करता येऊ शकतं”. हिंदी आणि इंग्रजीतही हे पुस्तक येणार असल्याची माहिती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

No comments

Powered by Blogger.