भाजपाची शिवसेनेला ऑफर -"उद्धव ठाकरेंनी चिंता करण्याचं कारण नाही"

Image result for bjp shiv sena
भाजपाची शिवसेनेला ऑफर -"उद्धव ठाकरेंनी चिंता करण्याचं कारण नाही"
शैक्षणिक क्षेत्रात मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांची ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या आठवडय़ात केलेल्या घोषणेच्या परस्परविरोधी असल्याने महाविकासआघाडीमधील मित्रपक्षांच्या भूमिका वेगळ्या असल्याचे उघड झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपाने शिवसेनेला एक आगळीवेगळी ऑफरच देऊ केली आहे. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुस्लीम आरक्षणावरुन महाआघाडीत मतभेदाबद्दल बोलताना, ‘या मुद्द्यावरुन वेळ पडल्यास आम्ही शिवसेनेच्या पाठिशी उभं राहू’ असं मत व्यक्त केलं आहे. मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुनगंटीवार यांनी हे वक्तव्य केलं.
“उद्धव ठाकरे यांनी मुस्लीम आरक्षणासंदर्भात घेतलेली भूमिका योग्यच आहे. याआधीच्या शिवसेना-भाजपा युतीची विचारसरणी एकच होती. त्या युतीला एका समान विचारसरणीचा आधार होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चिंता करण्याचं कारण नाही. उद्या मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढला तर आम्ही या मुद्द्यासाठी सरकारला पाठिंबा देऊ,” असं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाआघाडीत बिघाडी झाल्यास राज्यात पुन्हा युती सरकार सत्तेत येऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु झाली आहे.
मुस्लीम समाजाला शैक्षणिक संस्थांमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचा आणि त्यासाठी विधेयक मांडण्याची घोषणा अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी गेल्या आठवडय़ात विधान परिषदेत केली होती. धर्माच्या आधारावर मुस्लीम समाजास आरक्षण देण्यास ठाम विरोध दर्शवीत भाजपने या विषयावरून शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. आरक्षणाच्या मुद्दय़ावरून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असतानाच, या समाजास आरक्षणाबाबत कोणताही निर्णय झालेला नसून आरक्षणाचा विषयच आपल्यासमोर नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी स्पष्ट केले. जो मुद्दाच आमच्यासमोर आलेला नाही त्यावरून आदळआपट करण्याची गरज नाही, त्यांनी आपली ऊर्जा वाया घालवू नये. मुद्दा येईल तेव्हा त्यासाठी ती राखून ठेवावी,असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला.

No comments

Powered by Blogger.