भाजपा आमदार गुर्जर यांचं करोनाला चॅलेंज- “करोनाममध्ये हिंमत असेल तर माझ्या मतदारसंघात घुसून दाखवावं”

इराणमधून अलीकडेच मायदेशी परतलेल्या गझियाबादमधील एका व्यक्तीला करोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने देशात करोनाची लागण झालेल्यांची संख्या आता ३० वर पोहोचली आहे. जगभरात तीन हजारहून अधिक जणांचा बळी घेणाऱ्या करोना विषाणूचा भारतात शिरकाव झाल्याने चिंता व्यक्त केली जात असतानाच उत्तर प्रदेशमधील भाजपाच्या एका नेत्याने थेट या विषाणूलाच आव्हान दिलं आहे.
करोनामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये घुसून दाखवावं असं आव्हान भाजपाचे आमदार नंद किशोर गुर्जर यांनी केलं आहे. “करोना विषाणूमध्ये हिंमत असेल तर त्याने (माझा मतदारसंघ असणाऱ्या) लोनीमध्ये घुसून दाखवावं,” असं वक्तव्य गुर्जर यांनी एका पत्रकाराला फोनवर दिलेल्या मुलाखतीमध्ये केलं आहे. या संवादाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे.
“लोनीमध्ये रामराज्य आहे. आमच्याकडे नऊ गोशाळा आहेत. माझ्या मतदारसंघातील लोकं धर्म अन् कर्माबद्दल जागरुक आहेत. जिथे गाईचा वास आहे तिथे जगातील कोणताचा विषाणू येऊ शकत नाही,” असा दावा गुर्जर यांनी केला आहे. करोनाच काय तर इतर कोणताच विषाणू आमच्या येथे येऊ शकत नाही असा विश्वास गुर्जर यांनी व्यक्त केला आहे.
करोनाला केवळ आव्हान देऊन गुर्जर थांबले नाहीत तर त्यांनी थेट करोना नष्ट करु असंही वक्तव्य केलं आहे. “कोणत्याही विषाणूने इथल्या नागरिकांना त्रास दिला अथवा मारण्याचा प्रयत्न केला किंवा आजार पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यासाठी आम्ही पुरेसे आहोत. आम्ही त्याला ठीक करु. लोनीमध्ये कोणताही विषाणू वाचणार नाही. इथं कोणता विषाणू येणारच नाही ही आमची जबाबदारी आहे,” असं गुर्जर म्हणाले.
भाजपा नेत्यांनी अशाप्रकारे वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी भाजपाचे आसाममधील आमदार सुमन हरिप्रिया यांनी गोमूत्र आणि शेणामुळे करोना बरा होऊ शकतो असं मत व्यक्त केलं होतं.

No comments

Powered by Blogger.