मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर
मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे प्रथमच श्रीरामाचे दर्शन
घेण्यासाठी शनिवार, ७ मार्च रोजी अयोध्येला जाणार आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती केली असली शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा
सोडलेला नसल्याचा संदेश यातून उद्धव ठाकरे देणार आहेत. मात्र, करोनाची साथ
लक्षात घेता आरतीच्या वेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन शरयूच्या तटावरील
आरतीचा कार्यक्रम टाळण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शनिवारी सकाळी नऊ वाजता खासगी विमानाने
प्रयाण करतील व ११ वाजता लखनौ विमानतळावर पोहोचतील. तेथून वाहनाने ते
अयोध्येला रवाना होतील. दुपारी साडेतीन वाजता पत्रकारांशी संवाद
साधल्यानंतर सव्वाचारच्या सुमारास राम जन्मभूमीस्थळावर जाऊन दर्शन घेतील.
त्यानंतर लखनौकडे परतीच्या प्रवासासाठी निघतील. मुख्यमंत्रीपदाची शपथ
घेतल्यानंतर आपण अयोध्येला जाऊन रामाचे दर्शन घेणार असल्याची घोषणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार राज्य सरकारला १००
दिवस पूर्ण झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे हे अयोध्येला जात आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर, सीएए-एनपीआर याविषयांवर महाविकास आघाडी
सरकारसाठी शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका सोडून दिल्याचा आरोप भाजप करत आहे.
त्या आरोपांना कृतीमधून परस्पर उत्तर देण्याचा ठाकरे यांचा प्रयत्न आहे.
Post a Comment