‘एन ९५ मास्क’च्या विक्रीवर निर्बंध

करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘मास्क’ची साठेबाजी रोखण्यासाठी आता अन्न व औषध प्रशासनाने ‘एन ९५ मास्क’च्या विक्रीवर निर्बंध आणले आहेत. औषध विक्रेत्यांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मास्क आणि वैयक्तिक सुरक्षा साधने (पीपीई) यांची विक्री करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
मास्क आणि सॅनिटायझरची मागणी अचानक वाढल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. ‘एन ९५ मास्क’सह एकदा वापरून फेकण्याचे ‘मास्क’ही दुप्पट किमतीने विकण्याचे प्रकार घडत आहेत. परिणामी  ‘एन ९५ मास्क’ हे वैद्यक क्षेत्रातील कर्मचारी वापरत असलेले मास्क आणि ‘पीपीई’चा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ डॉक्टरांची चिठ्ठी असेल तरच त्यांची विक्री करण्याचे आदेश औषध प्रशासनाने काढले आहेत.  मास्कची साठेबाजी होऊ नये यासाठी प्रशासनाचे अधिकारी औषध दुकानांना भेटी देत आहेत. असे प्रकार आढळल्यास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली.
साबणाने हात धुणे हाच योग्य पर्याय!
र्निजतुकीकरणासाठी साबणाने हात धुणे हाच योग्य पर्याय आहे. पाणी उपलब्ध नसलेल्या भागांत सॅनिटायझर वापरले जाते. परंतु आपल्याकडे त्याची फारशी आवश्यकता नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता साबणाचा वापर करावा. मास्कऐवजी रुमाल वापरावा, असे डॉ. जयेश लेले यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी : करोना विषाणूच्या एका संशयित रुग्णाला शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केवळ लक्षणे आढळल्याने  खबरदारी म्हणून या रुग्णाला देखरेखीखाली ठेवण्यात आले असून करोनाचा संसर्ग झालेला नाही, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिली.

No comments

Powered by Blogger.