Coronavirus: फेसबुक देणार घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस आणि अतिरिक्त निधी
![]() |
Coronavirus: फेसबुक देणार घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस आणि अतिरिक्त निधी |
करोना विषाणूचा जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये फैलाव झाला आहे. याच
पार्श्वभूमीवर अनेक देशातील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरु काम
करण्याची मुभा दिली आहे. इतकचं नाही तर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिला
देणारे अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. फेसबुकचा संस्थापक मार्क झकेरबर्ग
याने फेसबुकच्या कर्मचाऱ्यांना सहा महिन्याचा बोनस आणि अतिरिक्त एक हजार
डॉलर देण्याची घोषणा केली आहे.
फेसबुकमध्ये पूर्णवेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ४५ हजार इतकी
आहे. या कर्मचाऱ्यांना सहामाही बोनस देण्यात येणार असल्याचे मार्कने
बुधवारी जाहीर केलं. तसेच घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मदत म्हणून
आर्थिक मदत म्हणून एक हजार डॉलर (जवळजवळ ७० हजार रुपये) अतिरिक्त निधी
देण्यात येणार आहे. सामान्यपणे फेसबुकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा
पगार २०१८ साली दोन लाख २८ हजार ६५१ डॉलर इतका होता. भारतीय चलनामध्ये हा
पगार एक कोटी ७० लाखांच्या घरात जातो.
एकीकडे पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना अतिरिक्त निधी देण्यात येत आहे तर
दुसरीकडे कॉनट्रॅक्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही फेसबुकने विचार केला
आहे. कॉनट्रॅक्टवर काम करणाऱ्यांना अतिरिक्त निधी मिळणार नसला तरी त्यांना
संपूर्ण पगार देण्यात येणार आहे. कॉनट्रॅक्टवरील कर्मचाऱ्यांनी करोनामुळे
घरुन काम केलं नाही तरी त्यांना त्यांचा पूर्ण पगार देण्यात येईल, असं ‘द
इनफॉर्मेशन’ने दिलेल्या अहवालात म्हटलं आहे.
कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये मार्क म्हणतो, “आम्हाला
कल्पना आहे की अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांची आणि कुटुंबाची काळजी
घेण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. तसेच घरुन काम करताना तुम्हाला काही
गोष्टी घ्याव्या लागणार असल्याने त्याचाही खर्च तुम्हाला करावा लागेल याचा
आम्हाला अंदाज आहे. त्यामुळेच आम्ही तुम्हा सर्वांना प्रत्येकी एक हजार
डॉलरचा अतिरिक्त निधी देत आहोत.”
जगभरातील एक लाख ९७ हजार जणांना करोनाची लागण झाली असून मरण
पावलेल्यांची संख्या सात हजारच्या वर पोहचली आहे. अमेरिकेमध्येही करोनाचा
फैलाव झाला आहे. फेसबुकने सर्व कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याचे आदेश दिले
असून आठवडाभरापासून कंपनीमधील बहुतांश कर्मचारी घरुनच काम करत आहेत.
करोनामुळे मोठा फटका बसलेल्या लहान कंपन्यांसाठी फेसबुक १०० मिलियन
डॉलरची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा कंपनीच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी
शेर्ली सॅण्डबर्ग्स यांनी केली आहे.
Post a Comment