Coronavirus | सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

coronavirus
Coronavirus | सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
coronavirus :सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सुट्टी देण्याच्या निर्णयाची चर्चा सुरु होती. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली जाणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. सोबतच मुंबईत लोकल आणि बससेवा बंद करणार नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं. आज कोरोनाच्या परिस्थितीची मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. यानंतर बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, राज्यात 40 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. एकाचा सकाळी मृत्यू झाला. या रुग्णांमध्ये 26 पुरुष तर 14 महिला आहेत. यातील एक रुग्ण गंभीर आहे. इतर रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
ते म्हणाले की, मी पुन्हा आवाहन करतोय, आजही आम्ही बस, ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. पण गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. गर्दी टाळा. पण जर गर्दी ओसरली नाही तर आम्हाला कठोर पावलं उचलावी लागतील, असंही ते म्हणाले, त्यांनी सांगितलं की, मी मुंबईतील दुकानदारांनाही विनंती करतोय की जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सोडून इतरांनी दुकानं बंद ठेवावीत.

ठाकरे म्हणाले की, मंत्रालय आणि सरकारी कार्यालयातील संख्या 50 टक्क्यांवर आणण्याचा प्रयत्न आहे. कमी उपस्थितीत आम्ही कसं काम चालवायचं याचा आढावा घेत आहोत. त्याचा आम्ही विचार करु, असं त्यांनी सांगितलं. आपण जे करता येणं शक्य आहे, ते आपण करतोय. पण सर्वांनी सहकार्य केलं तर संभाव्य धोका आपण टाळू शकतो.

बस, ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. पण गर्दी टाळली नाही तर नाइलाजानं असा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते, असं ते म्हणाले. ट्रॅफिक बऱ्यापैकी कमी झालं आहे. बस, ट्रेन अत्यावश्यक सेवा आहेत. त्या बंद करु नयेत याच मताचे आम्ही आहोत, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, केंद्र सरकारकडून येणाऱ्या कीटनुसारच रुग्णालयात चाचण्या होणार आहेत. कारण ते कीट्स योग्य प्रमाणीकरण करुन आपल्याकडे येत असतात. जे घरी राहायला तयार आहेत, त्यांच्या हातावर आपण क्वारंटाईनचा शिक्का मारत आहोत, असंही ते म्हणाले.No comments

Powered by Blogger.