करोनाची भीती नको..जाणून घ्या या आजाराची लक्षणे
जगभरात हजारोंचा बळी घेऊन आर्थिक संकट निर्माण करणाऱ्या करोना विषाणूची
चिंता भारतालाही तीव्रतेने भेडसावण्याचे संकेत आहेत. देशात सहा जणांना
करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले असून, संशयितांची संख्याही वाढली आहे.
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्राने चार देशांच्या नागरिकांचा व्हिसा
तूर्त रोखला आहे. मात्र भारतामध्ये करोनाचे संक्षयित रुग्ण
आढळण्याआधीपासूनच अनेकजण सार्वजनिक ठिकाणी मास्क घालून फिरताना दिसत आहेत.
पण करोना नक्की आहे काय? तो होतो कसा? त्याची लक्षणे काय? मास्क घालून
फिरणे गरजेचे आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सामान्यांना ठाऊक
नसतात. त्याच प्रश्नांची उत्तरे देण्याचा केलेला हा प्रयत्न…
करोना विषाणू म्हणजे काय आणि त्यावरील उपायांची माहिती देणारे चुकीचे
संदेश समाजमाध्यमांमधून पसरत आहेत. तेव्हा याबाबत घाबरून न जाता योग्य
माहिती समजून घेणे गरजेचे आहे. करोना हे विषाणूच्या एका समूहाचे नाव असून
माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये आढळतो. साध्या सर्दी-खोकल्यापासून ते सार्स
किंवा मर्ससारख्या गंभीर आजारांसाठी करोना विषाणू कारणीभूत असतात. चीनमधील
वुहान शहरात आढळलेला करोना विषाणू यापूर्वी माणसामध्ये आढळलेल्या सहा-सात
विषाणूंपेक्षा वेगळा आहे. म्हणून याला नोवेल करोना विषाणू असे म्हटले आहे.
मुख्यत्वे श्वसनसंस्थेशी निगडित लक्षणे असतात. सर्वसाधारणपणे
इन्फ्लुएन्झा आजारासारखीच लक्षणे असून सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास
होणे, न्युमोनिया, काही वेळ मूत्रपिंड निकामी होणे प्रामुख्याने आढळते.
श्वसनाशी निगडित संसर्गाप्रमाणे करोनाची लक्षणे आहेत. याबाबत राज्य
सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे सांगतात, कोरोना विषाणूची बाधा
झाल्यानंतर व्यक्ती पूर्णपणे बरी होऊ शकते. रोगप्रतिकारकशक्ती चांगली
असल्यास विषाणूची बाधा झाली तरी धोकादायक परिस्थिती उद्भवण्याची शक्यता कमी
असते. ज्येष्ठ व्यक्ती, तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह असलेल्या व्यक्ती
यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना बाधा होण्याची शक्यता असते.
Post a Comment