कामकाज करण्‍याची परवानगी असलेल्‍यांना विभाग कार्यालय स्‍तरावरुन प्रवास परवानगी पत्र

कामकाज करण्‍याची परवानगी असलेल्‍यांना विभाग कार्यालय स्‍तरावरुन प्रवास परवानगी पत्र
कोरोना विषाणू (कोविड-19) संसर्गाच्‍या पार्श्‍वभूमीवर, सध्‍या लागू असलेल्‍या संचारबंदीच्‍या आदेशातून ज्‍यांना कामकाज करण्‍यासाठी वगळण्‍यात आले आहे, त्‍या नागरिकांना कामाच्‍या ठिकाणी येण्‍या-जाण्‍यासाठी प्रवासाची परवानगी देण्‍याचे पत्र (पास) महानगरपालिकेच्‍या विभाग कार्यालय स्‍तरावर दिनांक 20 एप्रिल 2020 पासून दिले जाणार आहेत. त्‍यासाठी प्रत्‍येक विभागात दोन सहाय्यक विधी अधिकारी यांची नेमणूक करण्‍यात आली आहे. राज्‍य शासनाने कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी सुधारित मार्गदर्शक तत्‍वे निर्गमित केली आहेत. त्‍यामध्‍ये महाराष्‍ट्रामध्‍ये कोणत्‍या कामकाजांना परवानगी दिलेले आहे, त्‍याचे निर्देश दिलेले आहेत.
त्‍याअनुषंगाने नागरिकांना कामाच्‍या ठिकाणी ये-जा करण्‍यासाठी प्रवासाची परवानगी देण्‍याचे पत्र (पास) वितरित केले जाणार आहेत. त्‍यासाठी महानगरपालिकेतील प्रत्‍येक विभागात (वॉर्ड) दोन सहाय्यक विधि अधिकारी यांची नेमणूक करण्‍यात आली आहे. हे सहाय्यक विधि अधिकारी सकाळी 7 ते दुपारी 2 आण‍ि दुपारी 2 ते रात्री 9 अशा दोन सत्रांमध्‍ये कामकाज सांभाळतील. ज्‍या कार्यक्षेत्रांना लॉकडाऊनच्‍या काळात परवानगी दिलेली आहे, त्‍याबाबत सुधारित मार्गदर्शक तत्‍वांमध्‍ये दिलेल्‍या निर्देशानुसार हे परवानगी पत्र दिले जाईल.

सहाय्यक विध‍ि अधि‍कारी हे योग्‍य ती छाननी करुन त्‍यांच्‍या स्‍वाक्षरीने पासेस वितरित करणार आहेत. नागरिकांचे कामाचे ठिकाण ज्‍या विभागाच्‍या अखत्‍यारित येते, त्‍या विभाग कार्यालयामार्फत हे परवानगी पत्र दिले जाईल. ज्‍या नागरिकांनी प्रवासाची परवानगी मागण्‍यासाठी अर्ज केलेला आहे, त्‍यांच्‍याबाबतीत असा पास देण्‍यापूर्वी, आवश्‍यक संबंधित कागदपत्रांसाठी अर्जदाराने साध्‍या कागदावर स्‍वयंघोषित हमी पत्र (self declaration) दिले तरी ते पुरेसे राहील. या सहाय्यक विधि अधिकाऱ्यांच्‍या मदतीला संबंधित सहाय्यक आयुक्‍त यांच्‍यामार्फत कर्मचारी नेमण्‍यात येतील. त्‍यासाठी कोविड 19 संबंधी यापूर्वी कामकाज पाहत नसलेल्‍या आण‍ि वसाहत/मालमत्‍ता/दुकाने व आस्‍थापना इत्‍यादी विभागातून कर्मचारी नेमण्‍याचे निर्देशही देण्‍यात आले आहेत. वितरित केलेल्‍या परवानगी पत्रांचा दैनंदिन अहवाल हा प्रमुख कर्मचारी अधिकारी कार्यालयाकडे पाठवला जाणार आहे. ज्‍या खासगी रुग्‍णालयांना लॉकडाऊनच्‍या काळात कामकाज करण्‍यास परवागनी दिलेली आहे, अशा रुग्‍णालयातील कर्मचारी/डॉक्‍टर यांना त्‍यांच्‍या खासगी रुग्‍णालयातील प्रमुख हेच परवानगी पत्र देतील, असेही महानगरपालिका प्रशासनाने स्‍पष्‍ट केले आहे.

No comments

Powered by Blogger.