आशियाई विकास बँक भारताला देणार १.५ अब्ज डॉलर्सचं कर्ज

आशियाई विकास बँक भारताला देणार १.५ अब्ज डॉलर्सचं कर्ज
करोना व्हायरसच्या संकटात आशियाई विकास बँकेनं भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. आशियाई विकास बँकेनं करोना व्हायरस विरोधात सुरू असलेल्या लढाईत आर्थिक संसाधनांना मदत करण्यासाठी १.५ अब्ज डॉलर्सचं कर्ज मंजूर केलं आहे. “या संकटकाळात संघटना भारत सरकारच्या सर्व कामांना समर्थन देण्यासाठी कटिबद्ध आहे. हे कर्ज या संकटात त्वरित आवश्यक असलेल्या मदतीसाठी आहे,”असं मत आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मासात्सुगु असाकावा यांनी व्यक्त केलं.
करोनावर नियंत्रण मिळवणं, त्यापासून बचाव करणं आणि गरीब, तसंच आर्थिकरित्या मागासलेल्या लोकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी हे कर्ज मंजूर करण्यात आलं आहे. “त्वरित वितरित करण्यात येणारा निघी म्हणजे आशियाई विकास बँकेकडून दिल्या जाणाऱ्या मोठ्या पॅकेजचा एक भाग आहे,” असं असाकावा यांनी म्हटलं आहे.
गरीब, वंचितांना मदत मिळावी
“करोनाविरोधात भारत करत असलेल्या प्रयत्नांत भारताची मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. देशातील गरीब आणि वंचितांपर्यंत प्रामुख्यानं ही मदत पोहोचली पाहिजे,” असंही त्यांनी नमूद केलं.
आशियाई विकास बँकेनं गरजू देशांच्या मदतीसाठी ‘कोविड १९ अॅक्टिव्ह रिस्पॉन्स अँड एक्स्पेंडेचर प्रोग्राम’ (केअर्स) हाती घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून या देशांना बँकेकडून कर्ज देण्यात येत आहे. याद्वारे संबंधित देशातील आरोग्य सेवांमध्ये सुधारणा, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, शेतकरी, आरोग्य कर्मचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक, बांधकाम कामगारांसह आठ कोटींहून अधिक लोकांना सामाजिक सुरक्षा देण्यात येणार आहे.
जागतिक बँकेचाही पुढाकार
यापूर्वी जागतिक बँकेनंही विकसनशील देशांना करोनाचा प्रसार रोखण्यासाठी १.७ अब्ज डॉलर्सचा विशेष निधी देण्याचं जाहीर केलं होतं. यापैकी काही निधी हा भारतालादेखील मिळणार आहे. तसंच पुढील काही महिन्यांमध्ये १६० अब्ज डॉलर्सची मदत करोनाविरोधात लढण्यासाठी विकसनशील देशांना उपलब्ध करून देणार असल्याचंही बँकेनं सांगितलं आहे.

No comments

Powered by Blogger.