बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा, आम्हीही आंदोलनात उतरू
![]() |
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा, आम्हीही आंदोलनात उतरू |
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला
आहे. लवकरच देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु होणार आहे. परंतु, देशातील
अत्यावश्यक सेवा मात्र सुरु आहेत. लोकल ट्रेन्स बंद करण्यात आल्या असल्या
तरिदेखील बेस्ट बस मात्र सुरु आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता काम
करणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
आतापर्यंत जवळपास 100 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
अशातच बेस्ट कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे काही मागण्या केल्या होत्या.
त्यामुळे जर या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर
आम्हालाही त्यांच्यासोबत आंदोलनात उतरावं लागेल, असा इशारा भाजप नेते
प्रविण दरेकर यांनी दिला आहे.
भाजप नेते प्रविण दरेकर यांनी यासंदर्भात
एक फेसबुक पोस्ट केली आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, 'बेस्ट
कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा. मुंबईकरांचे जीव वाचविणारे योद्धे
म्हणून कार्यरत असणारे बेस्ट कर्मचारी आता स्वतःसाठी लढत आहेत. तर त्याचं
ऐकायला हवं! त्यांच्या जीविताच्या रक्षणाची हमी महापालिकेने घ्यायलाच हवी.
त्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा आम्हांलाही त्यांच्या आंदोलनात
मानवतेच्या भावनेतून उतरावं लागेल,' असं प्रवीण दरेकर म्हणाले.
सध्या शिवाजीनगर बेस्ट बस डेपोच्या बेस्ट
ड्रायव्हरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा ड्रायव्हर कोरनावर मात देऊन घरी
परतला असून तो या व्हिडीओमध्ये बोलताना म्हणाला की, 'माझ्या नावाचा गैरवापर
करुन बेस्ट संयुक्त कृती समितीनं सोमवार पासून बंद करण्याचं आवाहन बेस्ट
करंमचाऱ्यांना केलं आहे.' त्याला कुणी बळी पडू नये असं या कोरोनावर मात
करुन परतलेल्या बेस्ट ड्रायव्हरचं म्हणणं आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा
प्रादुर्भाव वाढतोय. बेस्ट कर्मचाऱ्यांना पुरेशी सुरक्षा दिली जात नाही
तसेच, बेस्ट कर्मचाऱ्यांना विमा देण्यात यावा, या मागणीसाठी बेस्ट संयुक्त
कृती समितीनं सोमवारपासून बेस्ट कर्मचाऱ्यांना कामावर न जाण्याचे आवाहन
केले आहे. मात्र, मुंबईवरील कोरोनाच्या संकटकाळात बेस्ट ही अत्यावश्यक
सेवांसाठी सुरु राहणं गरजेचं आहे. कृती समितीच्या आवाहनाला कुणी बळी पडू
नये. क्वॉरंटाईन काळ संपल्यानंतर आपण देखील कामावर हजर होणार असल्याचे या
बेस्ट ड्रायव्हरनं स्पष्ट केलं आहे.
Post a Comment