"सरकारने रेटिंग्स, जगातील प्रतिमेचा विचार आज करु नये"-– राहुल गांधी


वादळ अजून आलेलं नाही, ते येत आहे. पण ते आल्यावर मोठा आर्थिक फटका बसणार असून अनेकांना तो सहन करावा लागणार असल्याचा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारला जाहीर करण्यात आलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजवर पुनर्विचार करावा असा सल्लाही दिला आहे. शेतकरी, मजुरांच्या खिशात पैसे द्या या मागणीचा यावेळी त्यांनी पुनरुच्चार केला. राहुल गांधी यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.
राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या पॅकेजवर पुनर्विचार करावा. गरीबांना त्यांनी पैसे देण्याची गरज आहे. जर मागणी कमी झाली तर देशाचं करोनामुळे जितकं मोठं नुकसान झालेलं नाही त्याहून मोठं आर्थिक नुकसान होईल”. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “शेतकरी, मजुरांच्या खिशात पैसे द्या. सरकारने रेटिंग्स, जगातील प्रतिमेचा विचार आज करु नये. शेतकरी, मजूर, महिला, तरुण देशाचं रेटिंग्स बनवतात”.
“लोकांच्या खिशात पैसा नसेल तर लोक काय खाणार? मागणी आणि पुरवठ्याचं गणित सुधारण्यासाठी पैसे देणं गरजेचं आहे. पैसे राज्य सरकार अथवा केंद्र सरकारमार्फत द्या किंवा कसेही द्या पण पैसे द्या,” असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. “लॉकडाउनमध्ये शेतकरी, मजुरांचे हाल होत आहेत. त्यांना कर्ज देणारं पॅकेज नको, त्यांच्या खिशात पैसा द्यायला हवा. लोक रस्त्यावर तहान-भुकेने चालत आहेत, त्यांना दिलासा देण्याची गरज आहे,” असंही राहुल गांधींनी सांगितलं आहे. “शेतकरी, मजुरांनी हा देश उभा केला आहे, त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही,” असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
“लॉकडाऊन समजुतीने, अत्यंत काळजी घेऊन उठवावा लागेल. लॉकडाउन उठवताना दक्षता घ्यावी लागणार आहे. हा कोणता इव्हेंट नसावा. वृद्ध, व्याधीग्रस्तांची खबरदारी घेऊन लॉकडाऊन उठवावा,” असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे. “गरीबांच्या खात्यात पैसा जमा व्हावा यासाठीच आपण सरकारवर दबाव निर्माण करत आहोत,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

No comments

Powered by Blogger.