अंत्यसंस्कारामुळं झाला करोनाचा उद्रेक


एखाद्या घरात मृत्यू झाला, की त्या कुटुंबीयांचे सांत्वन करणे, त्याला धीर देणे, आपुलकीचे चार शब्द सांगणे ही भारतीय संस्कृती आहे. मात्र, करोनाच्या वैश्विक महामारीमुळे आता सांत्वन करणेही जीवावर बेतत असल्याच्या घटना समोर येत आहेत. याचा प्रत्यय उत्तर महाराष्ट्रातील चार कुटुंबीयांना आला असून, त्यामुळे करोनाचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. यात नाशिकमधील दोन, तर जळगाव जिल्ह्यातील दोन कुटुंबांचा समावेश असून, या कुटुंबांमुळे करोनाचा प्रसार वेगाने झाला आहे. अशा स्थितीत आता सांत्वन करायला जावे की नाही, अशा पेचात नातेवाईक सापडले आहेत. 
मृत्युपश्चात कुटुंबीयांना जवळच्या माणसांकडून, नातेवाइकांकडून सांत्वन केले जाते. हेतू हाच, की त्या कुटुंबाला दु:खातून बाहेर पडण्याची उभारी मिळते. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर सांत्वनासाठी नागरिकांच्या संख्येवरही मर्यादा आली आहे. विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील चार घटनांमुळे तर नातेवाइकांसह परिसरातील नागरिकही हादरले आहेत.

नवी मुंबईत मृत्यू झालेल्या नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारासाठी अंबड- लिंक रोडवरील रामकृष्णनगरमधील एक कुटुंब २ मे रोजी गेले होते. मात्र, या कुटुंबाला आपल्या नातेवाइकाच्या अंत्यसंस्काराला जाणे चांगलेच महागात पडले. यामुळे एका वृद्धाचा मृत्यूपश्चात अहवाल पॉझिटिव्ह आला असून, पूर्ण कुटुंबच हादरले आहे. एकूणच या घटनेमुळे जवळपास ५३ जणांना करोना संशयित म्हणून रुग्णालयात भरती व्हावे लागले. या वृद्धाच्या संपर्कातील कुटुंबातील हाय रिस्कमध्ये असलेल्या जवळपास २० जणांना करोनाचा धोका अधिक आहे. त्यामुळे या भागातही करोनाचा उद्रेक होण्याचा धोका वाढला आहे.

सातपूर कॉलनीतील एका महिलेने तीन आठवड्यांपूर्वी मालेगावजवळील चिंचगव्हाण येथील एका अंत्यसंस्काराला हजेरी लावली होती. अंत्यसंस्काराहून परतल्यानंतर संबंधित महिलेला करोनाची लागण झाल्याचे समोर आले. या महिलेमुळे जवळपास १० जणांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे सातपूर कॉलनीतच करोनाचा उद्रेक झाला होता. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथेही तीन आठवड्यांपूर्वी एका महिलेचा मृत्यू झाला होता. मृत्यूपश्चात महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता; परंतु या महिलेच्या अंत्यसस्काराला शंभरपेक्षा अधिक नातेवाइकांनी उपस्थिती लावली होती. त्यातील जवळपास दहा जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले, तर जवळपास ९० जणांना पंधरा दिवस क्वारंटाइन राहावे लागले होते. जळगावमधील वाघनगर परिसरातील एका महिलेचाही चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. ही महिला करोना संशयित होती. या महिलेच्या अंत्यसंस्कारालाही शंभरपेक्षा अधिक जणांनी हजेरी लावली होती. तिच्या संपर्कातील १६ जणांचे अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आले आहेत.

करोना संकटामुळे केंद्र सरकारने अंत्यसंस्कारासंदर्भात नियमावली तयार केली आहे. एखाद्या करोना संशयिताचा मृत्यू झाल्यास किंवा करोना बाधिताचा मृत्यू झाल्यास पाच लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्याचे नियम आहेत. मात्र, हे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचेच चित्र पाहायला मिळत आहे. या चारही घटनांमध्ये प्रत्येक ठिकाणी शंभर ते दोनशे नातेवाइकांनी उपस्थिती लावून करोनाचा फैलाव केल्याचे समोर आले आहे.

No comments

Powered by Blogger.