तळपत्या उन्हात श्रमिकांची वणवण थांबेना


लॉकडाउन'मुळे देशाच्या विविध भागांत अडकून पडलेल्या श्रमिकांची वणवण काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. कधी भरदिवसा तळपत्या उन्हात, तर कधी मध्यरात्री मिळेल त्या मार्गाने आणि मिळेल त्या वाहनाने आपले घर गाठण्यासाठी श्रमिकांची धडपड सुरू आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेशच्या सीमांवर श्रमिकांच्या कुटुंबांनी गर्दी केली आहे. त्यांचा हा उघड्यावरचा संसार आणि दिशाहीन होत जाणारी वाटचाल मन सुन्न करणारी आहे,पोलिस श्रमिकांना दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवरील आनंद विहार येथून हटकून लावतात, तर ते गाजीपूर सीमेवर येतात. गाजीपूर सीमेवरून पुन्हा उत्तर प्रदेश पोलिस हटकतात, तेव्हा ते एखाद्या उड्डाणपुलाखाली किंवा महामार्गावर जमेल तिथे आश्रय घेतात. साधारण दहा दिवसांपासून श्रमिकांचा हा खो-खो सुरू आहे. काही लोक त्यांना खाण्यासाठी देतात. त्यावर त्यांचा प्रश्न एकच आहे, की 'साहब, खाना बहोत लोक दे रहे हैं, लेकिन घर जाने की उम्मीद कहींसे नहीं मिल रहीं...!' त्यांच्या या प्रश्नांचे उत्तर कोणाकडे नाही का, असा प्रश्न आता पडू लागला आहे.राजकुमार यांनी सांगितले, त्यांना भागलपूरला जायचे आहे. हाताला सध्या काम नाही. त्यात घरमालक भाडे घेत आहेत. बाकी खर्चदेखील आहे. त्यामुळे अशा अवस्थेत घरी पोहोचलो, तर काही मार्ग निघेल. वाटेत उपाशी मरण्यापेक्षा गावात जाऊन मरण आले तरी बेहत्तर, अशी उद्विग्न भावना त्यांनी व्यक्त केली. अनेक श्रमिक त्यांची पत्नी आणि लहान मुलांना घेऊन चालत निघण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यांना गाजीपूर सीमेवरून पोलिस परतावून लावत आहेत.

No comments

Powered by Blogger.