दस्त नोंदणी कार्यालये सुरू

पुणे शहर आणि हवेली तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्रे वगळून इतर ठिकाणची दस्त नोंदणीची कार्यालये सोमवारपासून सुरू करण्यात आली. याबाबत राज्य शासनाने आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शहरातील दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्यास परवानगी दिली. शहरातील दस्त नोंदणीच्या २८ कार्यालयांपैकी १७ कार्यालये आणि एक विवाह नोंदणीचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
पुणे शहर आणि हवेली तालुका वगळता जिल्ह्य़ाच्या इतर भागातील २१ दस्त नोंदणीची कार्यालये १८ मेपासून सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राम यांनी यापूर्वीच दिले होते. त्यानुसार ही कार्यालये सुरू झाली आहेत. मात्र, पुणे शहर आणि हवेली तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्रे वगळून दस्त नोंदणीची कार्यालये सुरू करण्याची मागणी होती. त्यानुसार राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील प्रतिबंध क्षेत्रे वगळून दस्त नोंदणीची कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार सुरू झाले आहेत. याबाबत नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक ओमप्रकाश देशमुख यांनी राज्य शासन आणि जिल्हाधिकारी राम यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. त्यानुसार हे आदेश प्रसृत करण्यात आले आहेत.
पुणे शहरात २८ दस्त नोंदणीची कार्यालये आहेत. त्यापैकी प्रतिबंध क्षेत्र वगळता इतर ठिकाणची १७ कार्यालये सुरू करण्यात आली आहेत, तर एक विवाह नोंदणीचे कार्यालय सुरू झाले आहे. अन्य बारा तालुक्यांमधील २१ दस्त नोंदणी कार्यालये सुरू झाली आहेत. या कार्यालयांत केवळ पाच कर्मचारी उपस्थित राहतील, कार्यालयांमध्ये कामकाज करताना करोना विषाणूचा संसर्ग होणार नाही, याबाबतची खबरदारी घ्यावी, असे राज्य शासनाने आदेश दिले आहेत.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ातून दस्त नोंदणीची कार्यालये सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मागणी केली होती. त्यामुळे राज्य सरकारनेच याबाबत निर्णय घेण्याची विनंती विभागाकडून केली होती. त्यानुसार राज्यभरात प्रतिबंधित क्षेत्र वगळून अन्य ठिकाणची दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. राज्यातील ५१७ कार्यालयांपैकी केवळ ४१ कार्यालये प्रतिबंध क्षेत्रात आहेत. त्यामुळे राज्यातील पुणे, मुंबईसह ४७६ कार्यालये सुरू झाली आहेत.
– ओमप्रकाश देशमुख, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक
Post a Comment