महाराजांचं कार्य अतुलनीय, पायाच्या नखाचीही बरोबरी नाही :अशोक चव्हाण


छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा प्रचंड चढला आहे. राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत  आहेत. राज्यातील अनेक नेत्यांनी यावरुन भाजपवर टीका केली आहे. “कोणी कितीही प्रयत्न केला तरी त्याला महाराजांच्या पायाच्या नखाचीही बरोबरी करता येणार नाही,” अशी टीका काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली  आहे.
“छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्त्व आणि कार्य अतुलनीय आहे. कोणी कितीही प्रयत्न केला, तरी त्याला महाराजांच्या पायाच्या नखाचीही बरोबरी करता येणार नाही,” असे ट्विट करत अशोक चव्हाण यांनी भाजपवर टीका केली आहे.
शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील यावरुन माजी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांना हे मान्य आहे का? असा सवाल केला आहे.
संजय राऊत काय म्हणाले
“छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना या विश्वात कुणाशीच होऊ शकत नाही. एक सूर्य, एक चंद्र आणि एकच शिवाजी महाराज… ‘छत्रपती शिवाजी महाराज’. निदान महाराष्ट्र भाजपने तरी यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयनराजे, श्रीमंत शिवेंद्रराजे आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का? शिवरायांच्या वंशजांनो बोला. काहीतरी बोला.” असे संजय राऊत म्हणाले  होते.
त्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या जिभेला लगाम घालावा, अशी मागणीही संभाजीराजे यांनी केली. त्यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली.
संभाजीराजे म्हणाले, “उद्धवजी संजय राऊत यांच्या जिभेला लगाम घाला. ते प्रत्येक वेळी छत्रपती घराण्यावर गरळ ओकून राजकारण करत आहेत. त्यांनी आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंतीमध्ये (सिंदखेड राजा) काय बोललो आहे ते. त्यांची मुजोरी सहन केली जाणार नाही.”
‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’, भाजपकडून पुस्तक प्रदर्शित, सोशल मीडियावर संताप
दरम्यान, भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे काल (12 जानेवारी) प्रकाशन करण्यात आले. भाजपच्या दिल्ली प्रदेश कार्यालयात हा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तकात मोदींची तुलना थेट शिवाजी महाराजांशी केल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी हे नेते उपस्थित होते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भाजपवर नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे.

No comments

Powered by Blogger.