विजय वडेट्टीवार यांची आजच्या विशेष अधिवेशनाला दांडी, नाराज असल्याची चर्चा
![]() |
विजय वडेट्टीवार यांची आजच्या विशेष अधिवेशनाला दांडी |
मुंबई,8 जानेवारी: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिन्ही पक्षात समतोल साधत खातेवाटप केले. परंतु काही मंत्री यावर नाराज आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारही चांगले खाते न मिळाल्याने नाराज आहेत. यामुळेच त्यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीला दांडी मारून आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे नेते करत असताना विजय वडेट्टीवार हे आजच्या विशेष अधिवेशनालाही उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळाली आहे.
विजय वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप व पुनर्वसन या खात्याचा कार्यभार देण्यात आला आहे. मात्र, खातेवाटपावरुन वडेट्टीवार नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीलाही वडेट्टीवारांनी दांडी मारली होती.
चव्हाणविरुद्ध भुजबळ... 'खुर्ची'वरून वाद
खातेवाटपानंतर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीला नाराज मंत्र्यांच्या गैरहजेरीची पार्श्वभूमी असतानाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत खुर्चीवरूनही दोन ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये वाद झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे दोघेही मंत्रिमंडळ बैठकीसाठी आले. परंतु बसण्याच्या जागेवरून दोघांमध्येही वाद झाला. माजी मुख्यमंत्री आणि महत्त्वाचे खाते असल्याने अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या जवळची खुर्ची पटकावली परंतु छगन भुजबळ यांनी त्या खुर्चीवर बसण्याचा हट्ट धरल्याने दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती बैठकीला उपस्थित सूत्रांनी दिली. या वादात अन्य मंत्र्यांनी हस्तक्षेप केला आणि अशोक चव्हाण यांना माघार घ्यावी लागल्याचे समजते.
कोण आहेत विजय वडेट्टीवार?
> विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे चंद्रपुरातील ब्रम्हपूरचे आमदार आहेत.
> काँग्रेसचे विधानसभेतील ओबीसी समितीचे ते सदस्य आहेत
> विजय वडेट्टीवार यांनी 80 च्या दशकात एनएसयूआयमधून राजकीय कारकीर्द सुरु केली
> 1991 ते 93 दरम्यान ते गडचिरोली जिल्हा परिषदेचे सदस्य होते.
> 1998 ते 2004 या दरम्यान त्यांनी विधानपरिषदेची आमदारकी भूषवली.
> 2004 मध्ये ते चंद्रपुरातील चिमूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले.
> 2008 -09 मध्ये त्यांनी जलसंपदा राज्यमंत्रिपद भूषवलं होतं. शिवाय ते आदिवासी विकास, पर्यावरण आणि वन राज्यमंत्रीही होते.
> 2009-10 मध्ये ते पुन्हा चिमूरमधून निवडून आले.
> 2010 मध्ये अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांना पुन्हा विविध खात्यांचं राज्यमंत्रिपद मिळालं.
> 2014 मध्ये वडेट्टीवार पुन्हा ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आले.
> 24 जून 2019 रोजी त्यांची निवड महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदी झाली.
Post a Comment