वर्ध्याच्या जवानाचा मृत्यू
आर्मीमध्ये कार्यरत जवानाचा आज २२ फेब्रुवारी रोजी पहाटे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुण्याच्या रुग्णालयात ही घटना घडली. जवानाच्या पार्थिवावर उद्या २३ फेब्रुवारी रोजी आर्वी तालुक्याच्या मोरांगणा (खरांगणा) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आर्वी तालुक्यातील मोरांगणा (खरांगणा) येथील भूषण सुनीलराव दांडेकर (२९) हे आर्मीमध्ये नायक पदावर कार्यरत होते.
सोळा मराठा बटालीयनमध्ये कार्यरत भूषण दांडेकर यांनी कुपवाडा येथेही कर्तव्य बजावले आहे. बेळगाव येथे कर्तव्यावर असताना १३ फेब्रुवारी रोजी त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. जवानांना प्रशिक्षण देऊन आल्यानंतर तेथे भोवळ येऊन ते कोसळले. अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना सुरूवातीला बेळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. २० फेब्रुवारी रोजी त्यांना पुण्याच्या रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे आज २२ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली, असे वडिल सुनीलराव दांडेकर यांनी सांगितले. २०११ मध्ये ते आर्मीमध्ये रुजू झाले होते. नऊ वर्षे त्यांनी सेवा केली. दरम्यान, आज त्यांच्या मृत्यूची वार्ता धडकताच गावासह परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या मागे आईवडिल, पत्नी, भाऊ असा आप्तपरिवार आहे.
Post a Comment