अयोध्येचा राजा ८८ वर्षांचा

अयोध्येचा राजा ८८ वर्षांचा

मराठीतला पहिला बोलपट येण्यासाठी १९ वर्षांचा काळ जावा लागला. व्ही शांताराम यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं. या चित्रपटाची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली. गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांनी या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. हा सिनेमा आजही सिनेसृष्टीतला मैलाचा दगड ठरला आहे. कारण मराठी सिनेमा बोलका झाला तो याच सिनेमामुळे. हिंदीत आलम आरा नावाचा सिनेमा १९३१ मध्ये आला. त्यानंतर वर्षभराने १९३२ मध्ये हा सिनेमा आला कारण तोपर्यंत बोलपटांचं तंत्र विकसित झालेलं नव्हतं.
मराठी सिनेमानं गेल्या अनेक वर्षांमध्ये खूप चांगली प्रगती केली आहे. मराठी सिनेमा प्रयोगशीलही झाला आहे. मात्र या सगळ्याची मुहूर्तमेढ रोवली गेली होती ती आजपासून ८८ वर्षांपूर्वी. ६ फेब्रुवारी १९३२ हाच तो दिवस होता ज्या दिवशी चित्रपट महर्षी व्ही शांताराम दिग्दर्शित अयोध्येचा राजा हा सिनेमा मुंबईत प्रदर्शित झाला होता. ‘अयोध्येचा राजा’ हा बोलपट प्रसिद्ध होऊन ८८ वर्षे पूर्ण झाली आहेत. या ८८ वर्षात झालेले बदल अमूलाग्र आहेत. सिनेमा बनवण्याचं तंत्र अत्यंत झपाट्याने विकसित झालं आहे. राजा हरिश्चंद्र हा दादासाहेब फाळकेंनी आणलेला पहिला मराठी सिनेमा. मात्र तो मूकपट होता. १९१३ मध्ये हा सिनेमा त्यांनी आणला होता.

‘अयोध्येचा राजा’ची कथा
अयोध्येचा राजा ही कथा राजा हरिश्चंद्र, तारामती आणि त्यांचा मुलगा रोहिदास यांच्या पुराणकथेवर आधारलेली होती. वसिष्ठ ऋषींनी राजा हरिश्चंद्राचं कौतुक केल्याने विश्वामित्र ऋषी हरिश्चंद्राची परीक्षा घेण्याचं ठरवतात. राजा हरिश्चंद्राला स्वप्न पडतं आणि त्यात तो आपलं राज्य विश्वामित्रांना दान करतो असं त्याला दिसतं. या स्वप्नाच्या दुसऱ्याच दिवशी विश्वामित्र राजा हरिश्चंद्राच्या दरबारी येतात. त्याला वचनाची आठवण करुन देतात. स्वप्नात दिलेलं वचनही राजा हरिश्चंद्र पूर्ण करतो. त्यानंतर विश्वामित्र हर तऱ्हेने हरिश्चंद्राची परीक्षा घेतात. मात्र राजा हरिश्चंद्र हिंमत सोडत नाही. सत्याची कासही सोडत नाही. त्याची पत्नीही त्याला साथ देते. शेवटी शंकर प्रसन्न होतात आणि राजा हरिश्चंद्राला त्याचा राज्य परत मिळते. विश्वामित्रही त्यांना आशीर्वाद देतात.
असा सगळा पौराणिक संदर्भ असलेली कथा या चित्रपटात दाखवण्यात आली होती. कथाभाग पौराणिक असल्याने बराचसा कथाभाग हा गाण्यांमधून पुढे सरकतो. गाण्यांच्या तुलनेत सिनेमात संवाद कमी होते. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर प्रभात कंपनीने इतरही सिनेमांची निर्मिती केली. या सिनेमात गाण्यातून कथा पुढे सरकते ही पद्धत वापरण्यात आली होती. हा प्रयोग आजही काही सिनेमामध्ये केला जातो.  या सिनेमात पंधरा गाणी होती.
प्रभातविषयी थोडंसं
प्रभात फिल्म कंपनी ही महाराष्ट्रातील बोलपट आणि चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांपैकी एक होती. प्रभातच्या चित्रपटांमध्ये दर्जात्मक प्रयोगांसोबतच तांत्रिक गुणवत्ताही होती. व्ही. शांताराम, विष्णुपंत दामले, शेख फत्तेलाल, केशवराव धायबर आणि सीताराम बी. कुलकर्णी यांनी एकत्र येऊन १९२९ मध्ये प्रभात ही कंपनी स्थापन केली. १९३२ मध्ये या कंपनीने त्यांचे मुख्यालय पुण्यात हलवले. १९२९ ते १९४९ या कालावधीत प्रभात कंपनीने २० मराठी, २९ हिंदी सिनेमांची निर्मिती केली. मात्र आर्थिक दिवाळखोरीमुळे १९५२ मध्ये प्रभात कंपनीला स्टुडिओसह सगळी मालमत्ता विकावी लागली.
व्ही शांताराम यांच्याबाबत थोडसं..
दादासाहेब फाळके हे चित्रपटसृष्टीचे जनक होते. तर व्ही शांताराम यांना चित्रपट महर्षी म्हटलं जात असे. दादासाहेब फाळके यांच्यापासूनच त्यांनी प्रेरणा घेतली होती. त्यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९०१ रोजी झाला होता. कोल्हापुरातील बाबूराव पेंटर यांच्या मालकीच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीत ते उमेदीच्या काळात पडेल ते काम करत होते. १९२१ मध्ये त्यांनी सुरेखा हरण नावाच्या सिनेमात काम केलं. तिथूनच महाराष्ट्राच्या चित्रपट महर्षीच्या जडणघडणीची सुरुवात झाली. १९२७ मध्ये त्यांनी नेताजी पालकर हा पहिला मूकपट दिग्दर्शित केला. बाबूराव पेंटर यांच्याकडे नऊ वर्षे नोकरी केल्यानंतर व्ही शांताराम यांनी दामले, फत्तेलाल, धायबर आणि कुलकर्णी यांच्यासोबत भागीदारी करुन प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली. १९३७ मध्ये आलेला संत तुकाराम हा सिनेमाही प्रभात कंपनीचीच निर्मिती होती. हा सिनेमा भारतीय चित्रपटसृष्टीतला इतिहास घडवणारा सिनेमा ठरला. कारण व्हेनीस महोत्सवात संत तुकाराम हा सिनेमा दाखवण्यात आला. भारताबाहेर दाखवण्यात आलेला हा पहिला चित्रपट ठरला. पुढे १९४२ मध्ये व्ही. शांताराम यांनी प्रभात फिल्म कंपनी सोडली. त्यानंतर मुंबईत येऊन राजकमल कला मंदिर या स्वतःच्या चित्रपट संस्थेची स्थापना केली. राजकमल संस्थेने १९४६ मध्ये डॉ. कोटणीस की अमर कहानी हा सिनेमा आणला. त्यानंतर आले अमर भूपाळी, झनक झनक पायल बाजे, दो आँखे बाराह हाथ, नवरंग हे चित्रपट विशेष उल्लेखनीय ठरले. व्ही शांताराम यांनी डॉ. कोटणीस आणि दो आँखे बारा हात या सिनेमात भूमिकाही केली. चित्रपट या माध्यमाची भाषा काय असते आणि ती काय परिणाम साधू शकते हे व्ही शांताराम यांना अचूक कळलं होतं.

No comments

Powered by Blogger.