भाजपचं सावरकर प्रेम खोटं शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

वीर सावरकरांच्या पुण्यातिथीचं निमित्त करून भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. सत्तेच्या लोभासाठी शिवसेना काँग्रेससमोर लाचार होत असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. भाजपच्या या टीका आणि आरोपांना शिवसेनेनं आज उत्तर दिलंय. 'सामना'च्या अग्रलेखात भाजपवर सडकून टीका करण्यात आलीय. वीर सावरकरांची ढाल! भाजपचा पुळका खोटा!! या अग्रलेखात संजय राऊत यांनी भाजपचं सावरकर प्रेम खोट आहे त्यांना राजकारणासाठी त्याचा पुळका आलाय असा आरोप केलाय.
वीर सावरकरांच्या विषयावर सरकारची कोंडी करू असं भाजपला वाटलं होतं मात्र जे स्वतःच कोंडीत सापडले आहेत त्यांनी दुसऱ्यांची कोंडी करण्याची भाषा करू नये. महाराष्ट्रात सरकारची कोंडी करण्यापेक्षा केंद्रातील भाजप सरकारने वीर सावरकरांचा काय सन्मान राखला यावर महाराष्ट्रातील फडणवीस, पाटील, मुनगंटीवार, शेलार आदी मंडळींनी प्रश्न उभे केले पाहिजेत. असं सामनात म्हटलं आहे. भाजप या राजकारणात यशस्वी होणार नाही. लोक यांच्या ढोंग्यांच्या पेकाटात लाथ मारतील असं ठाकरे शैलीत टोलाही भाजपला लगावण्यात आलाय.

सावरकर हा भाजपसाठी आदर किंवा श्रद्धेचा विषय राहिला नसून फक्त राजकारणाचा विषय बनला आहे. भाजपतर्फे विधानसभेत सावरकर गौरवाचा प्रस्ताव आणणे व त्यावर चर्चा करणे ही ‘कोंडी’ करण्याची योजना कशी होऊ शकते? वीर सावरकर हा फक्त चर्चेचा विषय नाही, तर कृतीचा आणि जगण्याचा विषय आहे. वीर सावरकर हे त्याग, तत्त्व, तेज आणि संघर्षाच्या बाबतीत सगळय़ांनाच पुरून उरले व हयातभर त्यांचे स्थान अढळ राहिले. सावरकरांच्या स्मृतिदिनी त्यांचे पुण्यस्मरण सगळ्यांनीच केले. त्यांच्या स्मरणाचे ढोंग आज जे करीत आहेत त्यांना सावरकर खरेच कळले काय?
कालच्या प्रजासत्ताक दिनीही मोदी सरकारने वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ का जाहीर केला नाही? यावर महाराष्ट्रातील हे नव सावरकरप्रेमी काही प्रकाश टाकणार आहेत काय? महाराष्ट्राच्या विधानसभेने ठराव करावा वगैरे मागणी ठीक आहे, पण फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याविषयी दोन पत्रे पंतप्रधान मोदी यांना पाठवली होती. त्याचे पुढे काय झाले? त्या पत्रांची दखल केंद्राने घेतली नाही हा महाराष्ट्राचा आणि वीर सावरकरांचाही अपमान आहे!

No comments

Powered by Blogger.