जपानच्या क्रूझवरील करोनाग्रस्त दोघांचा मृत्यू

जपानच्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या डायमण्ड प्रिन्सेस या क्रूझवरील दोघा वयोवृद्ध माजी प्रवाशांचा करोना विषाणूच्या संसर्गाने गुरुवारी मृत्यू झाला आहे, असे जपानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. करोना विषाणूची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर क्रूझवरून निघून गेलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतामधील सात जणांना करोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मृत्यू झालेल्या दोघांमध्ये एक महिला आणि एक पुरुष असून ते दोघेही जपानचे नागरिक आहेत. गेल्या आठवडय़ात त्यांना क्रूझवरून बाहेर काढण्यात आले होते. मात्र रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. गेल्या एका आठवडय़ापासून क्रूझ योकोहामा बंदरावर उभी असून त्यामधील सात भारतीयांना करोना विषाणूचा संसर्ग झाला आहे.
क्रूझवरील प्रवाशांपैकी ७९ जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती जपानच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे क्रूझवरील लागण झालेल्यांची संख्या आता ६२१वर गेली आहे. बुधवारी ४४३ प्रवाशांना क्रूझवरून उतरविण्यात आले, त्यांना विषाणूची लागण झाली नसल्याची खातरजमा करण्यात आली.
क्रूझवरील सर्व प्रवाशांना तेथून बाहेर काढण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अद्याप तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. क्रूझवरील ज्या प्रवाशांच्या वैद्यकीय चाचणीत लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले त्यांना १४ दिवस वेगळे ठेवण्यात आल्यानंतर त्यांची मायदेशी रवाना करण्यात येत आहे.

जपानच्या क्रूझवरील आणखी एका भारतीय नागरिकाला करोना विषाणूची लागण झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे या क्रूझवरील भारतीय नागरिकांना करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या आता आठ झाली आहे, असे गुरुवारी भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आले. या क्रूझवर एकूण १३८ भारतीय असून त्यामध्ये १३२ कर्मचारी आणि सहा प्रवाशांचा समावेश आहे. क्रूझवरील ७९ जणांना करोनाची लागण झाली असून त्यामध्ये एका भारतीयाचा समावेश असल्याचे भारतीय दूतावासाने ट्वीट केले आहे. करोनाची लागण झालेल्या आठही भारतीयांवर उपचार केले जात असून ते उपचारांना योग्य प्रतिसाद देत आहेत, असेही दूतावासाने म्हटले आहे.

No comments

Powered by Blogger.