दिल्ली हिंसाचार- मृतांचा आकडा २५ वर; १८ जणांवर गुन्हे, १०६ जणांना अटक
दिल्लीत चार दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचारात आत्तापर्यंत २५ जणांना
आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर दोनशेच्यावर लोक जखमी झाले आहेत. तर
हिंसाचार घडवून आणणाऱ्या १८ संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच
१०६ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, गुरु तेग बहादूर रुग्णालयात आज
तीन गंभीर जखमींचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक
सुनीलकुमार यांनी सांगितले.
दिल्लीच्या संवेदनशील भागात आता ड्रोनच्या माध्यमातून लक्ष्य ठेवले जाणार
आहे. हिंसाचाराच्यावेळी या भागात घरांच्या छतावरुन दगडफेक करण्यात आली
होती. त्यामुळे ड्रोनच्या माध्यमातून छतांची पाहणी केली जात आहे. ज्या
लोकांनी दगडफेक केली त्यांच्याविरोधात पुरावे मिळलतील त्यानंतर त्यांच्यावर
कारवाई केली जाईल, असे दिल्लीचे पोलीस प्रवक्ते एम. एस. रंधवा यांनी
सांगितले.
रंधवा म्हणाले, सध्या दिल्लीतील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.
कोणालाही घाबरुन जाण्याची गरज नाही. ज्याना कोणतीही तक्रार करायची असेल तर
ते ११२ या हेल्पलाईनवर संपर्क करु शकतात. दरम्यान, त्यांनी जनतेला अफवा न
पसरवण्याचही आवाहन केलं आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत १८ जणांवर एफआयआर दाखल
करण्यात आला असून १०६ जणांना अटक करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी
सांगितले. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने हिंसाचार करणाऱ्यांची ओळख
पटवली जात असून त्यानुसार त्यांच्यावर कारवाई होईल, असेही रंधवा यांनी
स्पष्ट केले.
Post a Comment