चंदबागच्या जमावाच्या हल्ल्यात इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकाऱ्याचा मृत्यू
दिल्लीच्या चंदबाग भागामध्ये मंगळवारी रात्री जमावाने केलेल्या दगडफेकीत
इंटेलिजन्स ब्युरोच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. नाल्यामध्ये या
अधिकाऱ्याचा मृतदेह फेकून देण्यात आला होता असा दावा त्याच्या नातेवाईकांनी
केला आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु झालेल्या या हिंसाचारामध्ये
उत्तर-पूर्व दिल्लीत आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्काराला बोलवा, तरच लोकांमध्ये विश्वास
निर्माण होईल. कारण पूर्ण प्रयत्न करुनही दिल्ली पोलिसांना परिस्थिती
नियंत्रणात आणता येत नाहीय असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार
आहेत. त्यांनी जबाबदारी स्वीकारुन तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत
होत्या. दिल्लीत झालेला हिंसाचार चिंतेचा विषय असून, केंद्राने जाणीवपूर्वक
७२ तासात कारवाई केली नाही असा आरोप काँग्रेसने केला आहे.

दिल्लीत झालेला हिंसाचार पूर्वनियोजित कटाचा भाग आहे. भाजपा नेत्यांच्या
चिथावणीखोर वक्तव्यांमुळे हा हिंसाचार उफाळला असा आरोप सोनिया गांधी यांनी
केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तात्काळ अतिरिक्त सुरक्षा बंदोबस्त
तैनात करण्याची मागणी त्यांनी केली. केंद्राने कुठलीही कारवाई न
केल्यामुळे हा हिंसाचार वाढला असा आरोप त्यांनी केला.
Post a Comment