राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांनी भाजप नेत्याला खडसावलं

राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांनी भाजप नेत्याला खडसावलं

बबनराव लोणीकर यांनी महिला तहसिलदाराचा उल्लेख हिरोईन असा केला. त्यानंतर बबनराव लोणीकर आणि भाजपवर चौफेर टीका होत आहे. लोणीकर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महिलेबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर या आक्रमक झाल्या आहेत. 'असं बोलणं त्यांच्या संस्काराचा भाग आहे. मला लोणीकरांना एकच सांगायचंय...होय, आम्ही हिरोईन आहोतच पण सावित्रीच्या विचारांने, त्यामुळे त्यांनी विचार करून बोलावे,' असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी लोणीकरांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, लोणीकर यांनी स्थानिक तहसिलदार असलेल्या महिला अधिकाऱ्याचा आक्षेपार्ह उल्लेख केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. जालना जिल्ह्यातल्या परतूर कऱ्हा इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते. या आधीही लोणीकर यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाले आहेत. निवडणुकीच्या काळात लोणीकर यांनी पैसे वाटल्याचं वक्तव्य केलं होतं. तसंच राहुल गांधी यांच्यावरही पातळी सोडून टीका केली होती. त्यामुळेही वाद निर्माण झाले होते.
परतूर कऱ्हा इथं एका विद्युत उपकेंद्राच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. त्यावेळी झालेल्या सभेत बोलताना त्यांनी राज्य सरकारविरुद्ध मोठा मोर्चा काढू अशी घोषणा केली. असा मोर्चा निघाला तर त्याचा सरकारला हादरा बसेल असंही ते म्हणाले. हा मोर्चा हा भव्य असावा. 25 हजार शेतकरी त्या मोर्चाला आले पाहिजे असं लोणीकर यांनी सांगितलं.
'या मोर्चाला कोण बोलवायचं ते सांगा. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, चंद्रकांतदादा पाटील असो, की सुधीर मुनगंटीवार कुणाला मोर्चासाठी आणायचं ते तुम्ही फक्त सांगा,' असं लोणीकर म्हणाले. नंतर त्यांची जीभ घसरली. या मोर्चासाठी कुठली हिरोईन आणायची ते का सांगा? असा सवाल त्यांनी लोकांना केला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. कुणी हिरोईन मिळाली नाही तर तहसिलदारालाच घेऊन येतो. त्याच हिरोईनसारख्या दिसतात,' असं बेताल वक्तव्य लोणीकर यांनी केलं.

No comments

Powered by Blogger.