शीना बोरा हत्याकांड प्रकरणात देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेची चौकशी करणार
राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात वरिष्ठ पोलीस अधिकारी देवेन भारती
यांच्यासह फडणवीसांवर आरोप केले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सरकारची
भूमिका स्पष्ट केली असून, या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची नेमकी काय
भूमिका होती याची गरज पडल्यास चौकशी करू, असं म्हटलं आहे. त्यामुळे फडणवीस
यांच्यासमोरील कटकटी वाढण्याची चिन्हं आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी शीना बोरा हत्याप्रकरणात
केलेल्या गौप्यस्फोटानंतर माजी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
यांचं नावं चर्चेत आलं आहे. राकेश मारिया यांनी ‘लेट मी से इट इट’ पुस्तक
लिहिलं आहे. या पुस्तकाची प्रकाशनाआधीच चर्चा सुरू आहे. प्रचंड गाजलेल्या
शीना बोरा हत्याकांड प्रकरणात मारिया यांनी पोलीस अधिकारी देवेन भारती
यांच्यासह तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत.
पुस्तकात करण्यात आलेल्या आरोपांवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख
यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशमुख म्हणाले,”राकेश मारिया यांनी आपल्या
पुस्तकात शीना बोरा प्रकरणी जे काही लिहिले आहे त्याची माहिती आम्ही गोळा
करू. तसेच मारिया यांच्याशीही यासंदर्भात बोलू. देवेंद्र फडणवीस यांच्या
नेतृत्वातील सरकारमध्ये घडलेल्या घटनेविषयी आणि त्यांच्यावर आरोपांबद्दल
जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांची
नेमकी काय भूमिका होती, याचीही चौकशी गरज पडल्यास करण्यात येईल,” असं
देशमुख म्हणाले.
मारिया यांनी आपल्या पुस्तकात एटीएसचे तत्कालिन अतिरिक्त महासंचालक
(एडीजी) देवेन भारती यांच्यावर शीना बोरा हत्याकांडातील तपासादरम्यान
दिशाभूल केल्याचा ठपका ठेवला आहे. देवेन भारती यांची पीटर मुखर्जी याच्याशी
ओळख होती. याची माहिती त्यांनी कधीच केला नाही, असा आरोप त्यांनी केला
आहे. शीना बोराच्या हत्येमध्ये पीटरचा सहभाग नव्हता, अशी चुकीची माहिती
कोणीतरी माझ्या नावाने मुख्यमंत्र्यांना दिल्याचा संशय त्यांनी पुस्तकात
व्यक्त केला आहे.
Post a Comment