नवजात बाळाला जन्माच्या अवघ्या ३० तासांमध्ये लागण
![]() |
नवजात बाळाला जन्माच्या अवघ्या ३० तासांमध्ये लागण |
चीनमध्ये कोरोना व्हायरसचे थैमान सुरूच असून या व्हायरसचं केंद्रबिंदू असलेल्या वुहान शहरामध्ये एका नवजात बाळाला जन्माच्या अवघ्या ३० तासांमध्ये जीवघेण्या व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय. चीनच्या सरकारी मीडियाने बुधवारी याबाबत माहिती दिली.
हे बाळ कोरोना व्हायरसची लागण झालेली चीनमधील सर्वात कमी वयाची व्यक्ती ठरली आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत चीनमध्ये जवळपास ५०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालाय, तर २४ हजारांपेक्षा अधिक जणांना व्हायरसची लागण झाल्याची माहिती आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, नवजात बालकाला आईच्या गर्भात किंवा जन्म झाल्यानंतर लगेचच संक्रमण झाल्याची शक्यता आहे. बालकाला जन्म देण्याआधी आईचे रिपोर्ट्सही पॉझिटिव्ह आले होते. तज्ज्ञांनुसार ही घटना ‘व्हर्टिकल ट्रान्समिशन’चा प्रकार असू शकते. अशाप्रकारच्या घटनांमध्ये आईद्वारे गर्भात किंवा बाळाच्या जन्मानंतर व्हायरसची लागण होते.
दरम्यान, चीनमध्ये कोरोना विषाणूच्या उद्रेकाने हाहाकार माजवला असून विषाणूची बाधा झालेले प्रवासी इतर देशांमध्येही आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. दरम्यान, करोना विषाणू म्हणजे काय आणि त्यावरील उपायांची माहिती देणारे चुकीचे संदेश समाजमाध्यमांमधून पसरत आहेत. तेव्हा याबाबत घाबरून न जाता योग्य माहिती समजून घेणे गरजेचे आहे.
Post a Comment