अक्कलकोट मध्ये वागदरी पोलिसांवर दगडफेक

अक्कलकोट मध्ये वागदरी पोलिसांवर दगडफेक
सोलापुरातल्या अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे पोलिसांवरच दगडफेक झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रविवारी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास ही घटना घडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी देखील आदेश काढून जिल्ह्यातील सर्व धार्मिक कार्यक्रम, यात्रा, उत्सव रद्द करण्यास सांगितले आहे.

मात्र दरवर्षीप्रमाणे वागदरी येथे ग्रामदैवत परमेश्वराची यात्रा नियोजित होती. पोलिसांनी सूचना केल्यानंतर ही पाच दिवस चालणारी यात्रा रद्द करण्यात आलेली होती. दरवर्षी यात्रेच्या पाचव्या दिवशी धार्मिक विधी तसेच रथोत्सवाचा कार्यक्रम असतो. हे धार्मिक कार्यक्रम फक्त दोघांनी पार पाडावे. तसेच रथोत्सव रद्द करण्याची विनंती पोलिसांनी केली होती. यात्रा पंचकमिटीने देखील होकार देत घरी मानाच्या कळसाचे पूजन केले.

मात्र, पंच कमिटीने पूजा आटोपल्यानंतर अचानक काही हुल्लडबाजांचा गट एकत्रित आला. त्यांनी गर्दी करत रथ ओढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी लागलीच हस्तक्षेप करत गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केला. यामुळे ग्रामस्थांनी थेट पोलिसांवरच हल्ला चढवला आणि दगडफेक केली. या दगडफेकीत अक्कलकोटचे पोलिस निरीक्षक के. एस. पुजारी यांच्यासह तीन पोलिस कर्मचारी तसेच एक होमगार्ड जखमी झाले आहेत. पोलिस निरीक्षक के. एस. पुजारी यांच्या डोळ्याला आणि डोक्याला ईजा झाली आहे.

या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीणच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावात रात्री तणावपूर्ण शांतता होती. दरम्यान या प्रकरणात यात्रेच्या पंच कमिटीच्या सदस्यांसह जवळपास 40 ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती. दोषींवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती यावेळी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. 
संबंधित बातम्या पाहा

No comments

Powered by Blogger.