Coronavirus | उद्धव ठाकरेंनी मानले रोहित शेट्टीचे आभार

Coronavirus | उद्धव ठाकरेंनी मानले रोहित शेट्टीचे आभार
महाराष्ट्रात करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वतोपरी प्रयत्न करत असून आज त्यांनी मुंबई महानगर परिसरात, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूरमध्ये जीवनावश्यक सेवा सोडून सर्व बंद ठेवणार आहोत अशी मोठी घोषणा केली. ही बंदी ३१ मार्चपर्यंत असणार असून आज मध्यरात्रीपासून हे आदेश लागू होणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीचे आभार मानले.
रोहित शेट्टीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितलं की, “रोहित शेट्टी मला चार-पाच दिवसांपूर्वी भेटले. यावेळी त्यांनी मला मदत करण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं. ते फक्त बोलून थांबले नाहीत. तर त्यांनी एक अप्रतिम छोटी फिल्म तयार करुन महाराष्ट्र सरकारकडे दिली आहे. ती फिल्म सीएमओमधून रिलीज करण्यात आली आहे”.
उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, “मदत करण्यासाठी समाजातील काही संस्था, लोक पुढे येत असून आमच्याशी संपर्क साधत आहेत. अनेकांनी मदतीला सुरुवात केली आहे. अनेक दिग्गजांनी आपले काम थांबवून यामध्ये आम्हाला मदत केली आहे. चित्रपटसृष्टीतले, क्रीडा क्षेत्रातले सर्वच पुढे आले आहेत”. उद्धव ठाकरे यांनी रोहित शेट्टी, अमिताभ बच्चन, अनिल कपूर, माधुरी, शिल्पा शेट्टी, आलिया भट्ट, अक्षय कुमार, रणवीर कपूर, आयुषमान खुराना, अजय देवगण यांच्यासोबत विराट कोहली, सचिन तेंडुलकर यांचा यावेळी उल्लेख केला.

“सर्वत्र एकाच खबरदारीचा उपाय सांगितला जात आहे म्हणजे घरातच राहा. मी काल या लढ्याला युद्धाची उपमा दिली आहे. जगण्यासाठी आपल्याला घरात थांबण्याची वेळ आली आहे. काल मी आवाहन केले होते, त्याला प्रतिसाद मिळतोय . पुढचे १५ -२० दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. संसर्ग टाळणे महत्वाचे आहे. काही गोष्टी आपल्या काळजीसाठी घेत आहोत. आपले सहकार्य असू द्या,” असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.

“अनेकांनी सल्ले दिले आहेत की बसेस, रेल्वे बंद करा, पण अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांची ने आण कशी करणार? मनपा कर्मचारी, वाहनचालक काय करणार ? तूर्त या सेवा बंद न करता सरकारी कार्यालयांत २५ टक्के कर्मचारीच कामावर बोलावणार. बँका सुरूच राहतील. खासकरून मुंबई, पुणे-पिंपरी चिंचवड, नागपूर या मोठ्या शहरांत सर्व कार्यालये, दुकाने बंद होतील. यातून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहे. यात अन्नधान्य, दुध, औषधी यांचा समावेश आहे. या शहरांमध्ये कुणाला काही संभ्रम असेल तर संबंधित जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याशी बोलू शकतात. ज्या आस्थापना, दुकाने बंद करतो आहात त्यांना माझे आवाहन आहे की आपला जो कष्टकरी कर्मचारी वर्ग आहे त्यांना किमान वेतन देणे बंद करू नका,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
No comments

Powered by Blogger.