'अयोध्येला जाताय जनाची नाही किमान मनाची तरी...' मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी अयोध्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत.
त्यांच्या या दौऱ्यावर काही जणांकडून टीका करण्यात आली होती. आता
मनसेनेनंही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. अयोध्या दौऱ्यावर
जाण्यापूर्वी अयोध्येचा इतिहास लक्षात ठेवा, असं म्हणत मनसे नेते संदीप
देशपांडे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडी सरकाला १०० दिवस पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या
या अयोध्या दौऱ्यावर संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. त्यांनी
ट्विटरवरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “लक्षात ठेवा, प्रभू
रामचंद्रांनी वडीलांच्या सांगण्यावरून सत्तेला लाथ मारून चौदा वर्ष वनवास
भोगला आणि भरताला राज्य दिले .पण भरताने संधीसाधू पणा न करता
रामचंद्रांच्या पादुका ठेवून राज्य केले.असा इतिहास असलेल्या अयोध्येला
जाताय तेंव्हा जाताना जनाची नाही किमान मनाची तरी….शुभेच्छा” अशा आशयाचं
ट्विट त्यांनी केलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्याआधी शिवसैनिक अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. गुरुवारी
दुपारी कुर्ल्याच्या लोकमान्य टिळक टर्मिन्सहून शिवसैनिकांना घेऊन विशेष
ट्रेन अयोध्येसाठी रवाना झाली आहे. महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण
झाल्यानिमित्त उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेणार
आहेत. आयआरसीटीसीच्या माध्यमातून १८ डब्ब्यांची विशेष रेल्वेगाडी बुक
करण्यात आली होती, अशी माहिती वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. नियोजित
वेळेपेक्षा ही ट्रेन ४५ मिनिटे उशिराने सुटली. दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी
ही ट्रेन कुर्ल्याहून निघणार होती.
Post a Comment