सोलापुरात पोलिसाला जाळण्याचा प्रयत्न
![]() |
सोलापुरात पोलिसाला जाळण्याचा प्रयत्न |
सोलापुरातील माळशिरस तालुक्यातील मळोली गावात टाळेबंदी तथा संचारबंदी
काळात गस्त घालणाऱ्या एका पोलीस कर्मचा-यावर हल्ला करून त्याच्या अंगावर
पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली
आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला.
पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. अरूणसिंह फत्तेसिंह जाधव
(रा.,मळोली) असं आरोपीचं नाव आहे.
वेळापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी जावेद जमादार यांना परगावहून
काही व्यक्ती मळोली गावात आल्याची माहिती गावच्या पोलीस पाटलांकडून मिळाली
होती. यानंतर वेळापूर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव
यांच्या सूचनेनुसार पोलीस शिपाई जमादार हे पोलीस मित्रासह मळोली गावात
गेले. तेथे पोलीस पाटलाची वाट पाहात थांबले असता लाल रंगाच्या स्विप्ट
मोटारीतून अरूणसिंह जाधव तेथे आला.
त्याने पोलीस कर्मचारी जमादार यांना जातीवाचक शिवीगाळ करीत, साळमुख
चौकातील माझ्या भावाच्या हॉटेलची तपासणी का केली, असा जाब विचारत
त्यांच्यावर हल्ला केला. तेव्हा जमादार हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन
करीत असताना जाधव याने, एसपीला सांग किंवा आयजीला सांग, कोणीही माझे वाकडे
करु शकत नाही, असे सुनावत त्यांच्या हातातील मोबाइल हिसकावून घेत रस्त्यावर
दूर फेकून दिला. तू पुन्हा आमच्या हॉटेलची तपासणी केली तर याद राख, असे
धमकावत जातीवाचक शिवीगाळ केली.
नंतर जाधव याने ब्लेडने जमादार यांच्यावर वार केला. लाथाबुक्क्यांनी
बेदम मारहाण केली. त्यांच्या अंगावरील सरकारी गणवेशही फाडून टाकला. नंतर
त्याने स्वतःच्या मोटारीतून पेट्रोल भरलेली बाटली काढून, आता तुला जिवंत
सोडत नाही, असे पुन्हा धमकावत त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि पुढील
कृती करणार, तोच सोबतच्या पोलीस मित्रासह होमगार्ड व इतरांनी जाधव यास
रोखले. हा प्रकार घडल्याचे समजताच मळोली गावात पोलिसाची कूमक धावून आली.
पोलिसांनी आरोपी अरुणसिंह जाधव याला अटक केली आहे.
Post a Comment