गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी होम क्वारंटाइन

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी होम क्वारंटाइन
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांची करोना चाचणी करण्यात आली आहे. गुजरात सरकारने रुपानी यांची प्रकृती व्यवस्थित असून त्यांना काहीही झालेले नसल्याची माहिती दिली आहे. मात्र असं असलं तरी त्यांनी होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काही दिवस रूपाणी आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील कारभारावर नजर ठेवणार आहेत. काँग्रेस आमदार इम्रान खेडावाला यांची करोना चाचणी सकारात्मक आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. खेडावाला यांनी रुपानी आणि अन्य दोन मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर काही तासांमध्ये त्यांची करोना चाचाणी सकारात्मक आल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती.
मुख्यमंत्री रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी काल काँग्रेसचे आमदार इम्रान खेडावाला यांना भेटले होते. त्यानंतर काही तासांमध्ये खेडावाला यांच्या करोना चाचणीचा निकाल सकारात्मक आल्याने आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी करोना चाचणी घेण्यात आली. मुख्यमंत्र्यांचे सचिव अश्विनी कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार आज (बुधवारी) सकाळी डॉक्टर आर. के. पटेल आणि डॉ. अतुल पटेल यांनी रुपानी यांची तपासणी केली. या तपासणीनंतर रुपानी यांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सध्या रुपानी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, व्हिडिओ कॉलिंग आणि फोन कॉलच्या माध्यमातून राज्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पुढील सात दिवस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोणालाच प्रवेश देण्यात येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
करोनाचा रिपोर्ट येण्याच्या काही तास आधीच खेडावाल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आमदार इम्रान खेडावाला यांना काही दिवसांपासून ताप होता. चाचणीसाठी त्याचे नमुने घेण्यात आले होते. पण तपासणीचा अहवाल येण्याआधीच ते बाहेर फिरत होते. मात्र मुख्यंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये  नियमांचं योग्य पालन करण्यात आल्याचं दिसत होते. सर्वांनी मास्क घातले होते तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत एकमेकांमध्ये अंतर ठेवून बसले होते. मुख्यमंत्र्यांसोबत या बैठकीत इतर काही मंत्रीही उपस्थित होते. गुजरातमध्ये बुधवारी सकाळपर्यंत (१५ एप्रिल २०२० पर्यंत) करोनाचे ६१७ रुग्ण सापडले असून ५५ जणांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर २६ जणांचा मृत्यू झाला आहे.

No comments

Powered by Blogger.