कोरोनाविरोधी लढाईत निधी जमवण्यासाठी भारत-पाकिस्तान मालिका खेळवा शोएब अख्तरचा प्रस्ताव
![]() |
कोरोनाविरोधी लढाईत निधी जमवण्यासाठी भारत-पाकिस्तान मालिका खेळवा शोएब अख्तरचा प्रस्ताव |
कोरोना व्हायरसविरोधातील लढाईसाठी निधी
जमवण्याच्या उद्देशाने भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मालिका खेळवण्याचा
प्रस्ताव पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने ठेवला
आहे. दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय क्रिकेट मालिका खेळवण्यात
यावी, असं शोएब अख्तरने म्हटलं आहे.
पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेने 26
नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये एकही
क्रिकेट मालिका झालेली नाही. आयसीसी टुर्नामेंट आणि आशिया कपमध्येच दोन्ही
देशांचा सामना झाला आहे.
शोएब अख्तर म्हणाला की, "संकटाच्या काळात
दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांच्या मालिकेचा प्रस्ताव ठेवतो. या मालिकेचा
निकाल काहीही आला तरी पहिल्यांदाच दोन्ही देशांपैकी कोणत्याही
क्रिकेटप्रेमींना दु:ख होणार नाही. विराट कोहलीने शतक ठोकलं तर आम्ही खुश
होऊ. बाबर आजमने शतक केलं तर तुम्ही आनंदी व्हाल. सामन्याचा निकाल काहीही
आला तरी दोन्ही संघ विजयी होतील. यामुळे दोन्ही देशांचे राजकीय संबंधही
सुधारतील."
या संकटाच्या काळात दोन्ही देशांनी
एकमेकांची मदत करायला हवी. भारताने जर आम्हाला दहा हजार व्हेंटिलेटर दिले
तर पाकिस्तान ही गोष्ट कायम लक्षात ठेवेल. आम्ही केवळ सामन्यांचा प्रस्ताव
ठेवू शकतो. निर्णय अधिकाऱ्यांना घ्यायचा आहे," असंही शोएब अख्तर म्हणाला.
याआधी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद
आफ्रिदीच्या ट्रस्टला मदतीचं आवाहन करणारे भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंह
आणि हरभजन सिंह यांच्यावर जोरदार टीका झाली होती. याबाबत शोएब अख्तर
म्हणाला की, "हे अमानवी आहे. सध्याच्या परिस्थितीत देश किंवा धर्माची नाही
तर मानवतेची चर्चा व्हायला हवी."
भारताने 2008 पासून पाकिस्तानचा दौरा
केलेला नाही. तर पाकिस्तान एकदिवसीय आणि ट्वेण्टी-20 मालिकेसाठी 2012 मध्ये
अखेरचा भारत दौरा केला होता. या दोन्ही देशांनी मागील 8 वर्षांपासून
एकमेकांसोबत कोणतीही बायलॅटरल मालिका खेळलेली नाही.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये कोरोनाने थैमान
घातलं आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या चार हजारांच्या पार केली आहे.
आतापर्यंत 58 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र पंतप्रधान इम्रान खान यांनी
अजूनही लॉकडाऊन लावलेला नाही.
Post a Comment