७५ अब्ज डॉलर्सचा O2C व्यवसाय वेगळा करण्याचा RIL चा निर्णय

७५ अब्ज डॉलर्सचा O2C व्यवसाय वेगळा करण्याचा RIL चा निर्णय
रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडच्या संचालक मंडळानं कंपनीतील ७५ अब्ज डॉलर्सचा ऑईल टू केमिकल (O2C) व्यवसायाला एका वेगळ्या डिव्हिजनमध्ये बदलण्यास मंजुरी दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजकडून याबाबत माहिती देण्यात आली. O2C व्यवसायातील २० टक्के हिस्सा सौदी अरेबियातील मोठी कंपनी सौदी अरामको या कंपनीला विकता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
रिलायन्स O2C लिमिटेडकडे O2C उपक्रम हस्तांतरित करण्याची योजना मंजूर केली आहे, अशी माहिती रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडच्या संचालक मंडळानं चौथ्या तिमाहिच्या निकालाच्या निवेदनात दिली. कंपनीच्या O2C या व्यवसायात अॅसेट्स आणि लायाबिलिटीसोबत रिफायनिंग, पेट्रोकेमिकल्स, फ्युअल रिटेल, एव्हिएशन फ्युअल आणि बल्क मार्केटिंग व्यवसायाचा संपूर्ण O2C व्यवसायाचा सामावेश होतो. दरम्यान, यासाठी आता नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या मंजुरीसोबत कायद्यांतर्गत येणाऱ्या सर्व परवानग्या घेण्यात येणार असल्याचंही कंपनीकडून सांगण्यात आलं.
जिओ प्रमाणे स्वतंत्र बॅलंसशीट
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या मंजुरीनंतर कंपनीचा O2C व्यवसाय हा एक वेगळं युनिट बनणार आहे. त्यामुळे यानंतर जिओप्रमाणेच या कंपनीचीही स्वतंत्र बॅलंसशीट असणार आहे. RIL नं रिलायन्स जिओसोबत आपल्या सर्व डिजिटल व्यवसायांना जिओ प्लॅटफॉर्ममध्ये एकत्र केलं आहे. गेल्याच आठवड्यात जिओ प्लॅटफॉर्मचा ९.९ टक्के हिस्सा फेसबुकला विकण्यास परवानगी देण्यात आली होती.
ऑगस्ट महिन्यात अरामकोसोबत व्यवहार
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात O2C व्यवसायातील २० टक्के हिस्सा सौदी अरामको या कंपनीला विकणार असल्याची घोषणा रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी केली होती. १५ अब्ज डॉलर्सना हा व्यवसाय करण्यात आला होता. या व्यवसायात रिलायन्सच्या सर्व रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल्स अॅसेट्सचा समावेश होणार आहे. याव्यतिरिक्त फ्युअल रिटेलिंग व्यवसायातील ४९ टक्के हिस्सा ब्रिटनच्या BP Plc ला विकल्यानंतर असलेला उर्वरित हिस्साही या व्यवहाराचा भाग असणार आहे. हा व्यवहार मार्च २०२० मध्ये पूर्ण होणार होता. परंतु आता या चालू वर्षात हा व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे.

No comments

Powered by Blogger.