ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर अनंतात विलीन

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर अनंतात विलीन
हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांचे साक्षीदार असलेले ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी सकाळी मुंबईत निधन झाले. एच.एन. रिलायन्स रुग्णालयात सिनेसृष्टीवर गारूड करणाऱ्या या कलाकाराची अखेर झाली. ऋषी कपूर यांच्या पार्थिवावर मुंबईतील चंदनवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लॉकडाउनमुळे त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यासह मोजकेच लोक अखेरचा निरोप देण्यासाठी हजर होते.
मुंबईतील चंदनवाडी येथील स्मशान भूमीत ऋषी कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला संपूर्ण कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. ऋषी कपूर यांचे भाऊ रणधीर कपूर, पत्नी नीतू कपूर, मुलगा रणबीर कपूर, आलिया भट्ट, करिना कपूर, सैफ अली खान, अभिषेक बच्चन, अरमान जैन, चित्रपट निर्माते आयान मुखर्जी आणि इतर मान्यवर हजर होते.
अभिनयाचा ठसा उमटणारा प्रतिभावंत
ऋषी कपूर यांनी अभिनयाच्या करिअरची सुरुवात वडिल राज कपूर यांच्या चित्रपटात काम करत केली होती. ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटात त्यांनी बाल कलाकार म्हणून काम केले. १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘बॉबी’ चित्रपटातील भूमिकेनंतर ऋषी कपूर खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आले. त्यांच्या या भूमिकेने त्यांनी अनेकांच्या मनावर राज्य केले.
ऋषी कपूर यांनी जवळपास ९२ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे. ‘बॉबी’ चित्रपटानंतर त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. त्यांनी ‘लैला मजनू’, ‘सरगम’, ‘प्रेम रोग’, ‘कर्ज’, ‘नागिन’, ‘हनिमून’, ‘हीना’, ‘बोल राधा बोल’, ‘कभी कभी’, ‘बदलते रिश्ते’, ‘आप के दीवाने’, ‘सागर’, ‘अजूबा’, ‘हम तुम’, ‘फना’, ‘नमस्ते लंडन’, ‘लव आज कल’, ‘दो दुने चार’ अशा अनेक चित्रटांमध्ये काम केले.
ऋषी कपूर यांनी त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘द बॉडी’ हा त्यांच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटात त्यांनी एसपी जयराम रावळ ही भूमिका साकारली होती. त्यांच्यासोबत या चित्रपटात अभिनेता इमरान हाश्मी, वेधिका कुमार, सोभिता धूलिपा हे कलाकार दिसले होते. ऋषी कपूर यांचा हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या स्पॅनिश चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही.a

No comments

Powered by Blogger.