रशियाच्या पंतप्रधानांना करोनाची लागण
![]() |
रशियाच्या पंतप्रधानांना करोनाची लागण |
सध्या करोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. जगभरातील ३२ लाखांपेक्षा
अधिक नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. तर २ लाख ३० हजारांपेक्षा अधिक
लोकांचा करोनानं मृत्यू झाला आहे. यादरम्यान रशियाचे पंतप्रधान मिखाइल
मिशुस्तिन यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. करोनाची लागण
झाल्याचं सिद्ध झाल्यानंतर त्यांनी स्वत:ला सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवलं आहे.
यानंतर त्यांनी संपूर्ण कामकाजाची धुरा उपपंतप्रधानांकडे सोपवली आहे.
रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिन यांनी गुरूवारी राष्ट्राध्यक्ष
व्लादिमीर पुतिन यांना याबाबत माहिती दिली. यावेळी मिखाइल मिशुस्तिन यांनी
टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. तसंच उपपंतप्रधान अँड्री बेलूसोव
यांच्याकडे त्यांच्या अनुपस्थितीत कामकाजाची धुरा सोपवण्याची विनंती केली.
यानंतर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या या प्रस्तावाचं
समर्थन केलं.
सध्या रशियामध्येही करोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. ज्या देशात
करोनाग्रस्तांचा आकडा १ लाखांच्या पार गेला आहे, अशा जगभरातील ८ प्रमुख
देशांमध्ये रशियाचा समावेश झाला आहे. रशियामध्ये आतापर्यंत १ लाख ६ हजार
४९८ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत करोनामुळे १ हजार ७३
लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे जगभरात ३२
लाखांपेक्षा अधिक लोकांना करोनाची लागण झाली असून २ लाख ३० हजारांपेक्षा
अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले
आहेत.
Post a Comment